सोनिया गांधीनी भाजप विरोधी पक्षांची बैठक बोलविली

एनडीएसोबत नसलेल्या बीजेडी, टीआरएस आणि वायएसआर या पक्षांनाही निमंत्रण

Updated: May 15, 2019, 04:12 PM IST
सोनिया गांधीनी भाजप विरोधी पक्षांची बैठक बोलविली  title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यूपीएतील घटकपक्षांची बैठक बोलविली आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी एनडीए सोबत नसलेल्या बीजेडी, टीआरएस आणि वायएसआर या पक्षांनाही निमंत्रण पाठवले आहे. येत्या २३ मे रोजी ही बैठक होणार आहे. म्हणजे लोकसभा निकालाच्या दिवशीच बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच २३ तारखेला बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले. ओडिशामध्ये नुकत्याच आलेल्या वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा सरकारला भरघोस मदत केली. त्यानंतर पटनायक यांनी मोदींचे आभार मानले होते. भाजपने बीजेडीला स्पष्ट संकेत दिले असून बीजेडी आता कोणता निर्णय घेईल ते पाहावे लागणार आहे.

तेलगु देसम पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी), बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर वायएसआरचे जगनमोहन रेड्डी यांना सोबत घेण्यासाठी दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे.

टीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांनी उपप्रधानमंत्री करण्याची मागणी पुढे केली आहे. त्यामुळे त्यांची ही मागणी काँग्रेस आणि भाजप पूर्ण करेल का, हा प्रश्न आहे. सोनिया गांधी या तिन्ही पक्षांना सोबत आणण्यात यशस्वी होतील का? हे २३ तारखेलाच स्पष्ट होऊ शकते.