श्रीनगर : मंगळवारी मध्यरात्रीपासून काश्मीरमधील सर्व भागात एसएमएस सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यासोबतच शाळा, कॉलेज आणि रुग्णालयातही इंटरनेट सेवा सुरु केली आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर लँडलाईन, इंटरनेट आणि एसएमएस सुविधा बंद करण्यात आली होती. त्यात सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली होती, मात्र आता जनजीवन पुर्ववत होत असताना इंटरनेट सेवाही सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील काही भागात लँडलाईन सेवा सुरु करण्यात आली होती.
जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी सांगितलं की, मंगळवारी मध्यरात्री सरकारी शाळा, रुग्णालयात ब्राडबँड सेवा सुरु करण्यात आली आहे. मोबाईल सेवा सुरु करण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये याचं स्वागत होत असल्याचं ते म्हणाले.
#JammuAndKashmir: SMS services restored in Kashmir valley from today. pic.twitter.com/A228Dzg5Jn
— ANI (@ANI) January 1, 2020
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी हळू हळू शिथिल केली जात आहे. आधी लँडलाईन सुविधा सुरु करण्यात आली. त्यानंतर पोस्टपेड मोबाइल फोन सेवा सुरू करण्यात आल्या. यानंतर जम्मूमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरु केली, तर काश्मीरमध्ये ब्रॉडबँड इंटरनेटवर अद्यापही बंदी आहे.
५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आलं होतं. अनुच्छेद ३७० रद्द करतानाच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले होते.