दिल्लीवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा

सहा दहशतवाद्यांच्या टोळीने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याची माहिती

Updated: Nov 15, 2018, 06:49 PM IST
दिल्लीवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा title=

नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मद संघटनेचे सहा दहशतवादी दिल्लीत घातपात करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुरुवारी गुप्तचर यंत्रणांनी दिला. हे दहशतवादी पंजाबमधून दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. यामुळे पंजाबमध्ये पोलिसांकडून हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. 

पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाने सहा दहशतवाद्यांच्या टोळीने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस महासंचालकांकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये दहशतवाद्यांनी सीमारेषेवरील फिरोझपूर येथून पंजाबमध्ये प्रवेश केल्याचे नमूद करण्यात आलेय. त्यादृष्टीने फिरोझपूर परिसराची नाकाबंदी करण्यात आलेय. येथील सर्व यंत्रणांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

या दहशतवाद्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले असल्यास त्यांना पकडण्यासाठी सर्व चौक्यांवर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी व्हावी, असे स्पष्ट निर्देश आहेत. तसेच लष्करालाही याबद्दल कळवण्यात आले आहे.