Salary Hike: जास्त मुलांना जन्म द्या पगारवाढ मिळवा; मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात केली घोषणा

Sikkim CM Prem Singh Tamang : मंकर संक्रांतीनिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा

Updated: Jan 17, 2023, 10:59 AM IST
Salary Hike: जास्त मुलांना जन्म द्या पगारवाढ मिळवा; मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात केली घोषणा title=
Give Birth to More Babies to Get Salary Hike (Photo- AFP)

Sikkim CM Prem Singh Tamang : सिक्कीमचे मुख्यमंत्री (sikkim cm) प्रेम सिंह तमांग (Prem Singh Tamang) यांनी अधिक मुलांना जन्म देणाऱ्या राज्यातील स्थानिक समुदायामधील लोकांना प्रोत्साहन देणार असल्याची घोषणा केली आहे. दक्षिण सिक्कीममधील जोरथांग शहरामध्ये रविवारी माकर संक्रांतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सिक्कीममधील प्रजनन दराबद्दल भाष्य केलं. "प्रजनन दरासंदर्भात मागील काही वर्षांमध्ये प्रति महिला एका मुलाहून कमी वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच जातीय समुदायामधील लोकसंख्या कमी झाली आहे," असं तमांग आपल्या भाषणात म्हणाले. "आपल्याला महिलांबरोबरच स्थानिकांनी अधिक संख्येनं मुलांना जन्म द्यावा यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. कमी होत असलेला प्रजनन दर वाढवण्याची आवश्यकता आहे," असंही तमांग म्हणाले.

एका वर्षाची मॅटर्निटी लिव्ह तर पुरुषांना 30 दिवस पॅरेंटल लिव्ह

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने आई झालेल्या महिलांसाठी दिलेल्या सोयीसुविधांचाही उल्लेख केला. सरकारने काम करणाऱ्या महिलांना 365 दिवसांची मॅटर्निटी लिव्ह आणि पुरुषांना 30 दिवसांची पॅरंटल लिव्ह मंजूर केल्याचं तमांग यांनी सांगितलं. मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही सूट देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच राज्य सरकारने सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दुसरं मुलं झाल्यावर एक पगारवाढ आणि तिसरं मुलं झाल्यानंतर दोन पगारवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मुख्यमंत्र्यांनी सामान्य लोकही अधिक मुलांना जन्म देण्यासंदर्भातील या आर्थिक मदतीसाठी पात्र असतील असंही यावेळी सांगितलं. या पैशाचं वाटप आरोग्य आणि महिला तसेच बालक विभागाच्या माध्यमातून केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आयव्हीएफसाठीही विशेष मदत

तमांग यांनी आपल्या सरकारने सिक्कीममधील रुग्णालयांमध्ये आयव्हीएफची (इन विट्रो फर्टिलायझेशन) सुविधा सुरु केल्याचं सांगितलं. या माध्यमातून सर्वसामान्य गर्भधारणेमध्ये अचडणी येत असतील तर महिलांना या माध्यमातून संततीप्रप्तीसाठी प्रयत्न करता येतील. या माध्यमातून मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना तीन लाख रुपयांपर्यंत मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आयव्हीएफच्या माध्यमातून आतापर्यंत 38 महिलांची गर्भधारणा झाली असून त्यापैकी काहींनी बाळांना जन्मही दिला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

80 टक्के लोक स्थानिक जातीय समुदायातील

तमांग यांनी सिक्कीमच्या लोकांना एका मुलाला जन्म देऊन कुटुंब छोटं ठेवण्यासाठी मागील सरकारने म्हणजेच पवन कुमार चामलिंग यांच्या सरकारने दबाव निर्माण केल्याचा आरोप करत टीका केली आहे. सध्या सिक्कीमची अंदाजित लोकसंख्या सात लाख इतकी आहे. यापैकी 80 टक्के लोक हे स्थानिक जातीय समुदायामधील आहेत.