...या मठात ठरतं सत्तेच्या मैदानातलं यश-अपयश!

कर्नाटकातला सिद्धगंगा मठ सत्तासिद्धीचं केंद्र... म्हणूनच भाजप अध्यक्ष अमित शाहांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपर्यंत सगळेच या मठाचा आशीर्वाद घ्यायला जातात

Updated: May 8, 2018, 11:49 PM IST

अमित प्रकाश, झी मीडिया, तुमकुर, कर्नाटक : कर्नाटकच्या सत्तेचा सारीपाट कुणाच्या बाजूनं बाजी टाकणार, याचे संकेत एका मठात मिळतात.... कर्नाटकातला लिंगायत समाजाचा हा मठ मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करतो.... पण राजकीय पटलावरही या मठाचा आशीर्वाद महत्त्वाचा मानला जातो. कर्नाटकात राजकीय युद्ध फक्त सत्तेच्या मैदानात लढलं जात नाही तर सत्तासुंदरीसाठी मठांच्या माध्यमातूनही धर्मयुद्ध सुरू असतं... कर्नाटकातली लिंगायत मतं महत्त्वाची आहेत... ती कुणाच्या बाजूनं जाणार त्याचीच दिशा एका मठात ठरते... 

कर्नाटकातला सिद्धगंगा मठ सत्तासिद्धीचं केंद्र... म्हणूनच भाजप अध्यक्ष अमित शाहांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपर्यंत सगळेच या मठाचा आशीर्वाद घ्यायला जातात... दिल्लीपासून जवळपास अडीच हजार किलोमीटर लांब असलेल्या सिद्धगंगा मठाचे महास्वामी श्रीश्रीश्री शिव कुमार १११ वर्षांचे आहेत.... त्यांचा आशीर्वाद निवडणुकीत फळतो, असं सांगितलं जातं.

सिद्धगंगा मठाविषयी थोडंसं...

- सिद्धगंगा मठ १४ व्या शतकातला आहे 

- सिद्धगंगा मठाच्या  कर्नाटकात सव्वाशे शैक्षणिक संस्था आहेत

- दहा हजार विद्यार्थ्यांना या मठात शिक्षण, निवासाची सोय आणि जेवण मोफत मिळतं

- सिद्धगंगा मठ लिंगायत समाजाचा सगळ्यात मोठा मठ समजला जातो 

- दरवर्षी इथे दहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.. 

- विशेष म्हणजे कुठल्याही धर्माच्या आधारावर प्रवेश दिला किंवा नाकारला जात नाही

- मुस्लीम विद्यार्थ्यांनाही या मठात प्रवेश दिला जातो

- तसंच या मठाचे दरवाजे सगळ्या जातीधर्मासाठी खुले आहेत

असं म्हणतात की सिद्धगंगा मठाची चूल कधीच बंद नसते... दिवस असो किंवा रात्र.... इथे कुणीही आला तरी तो उपाशी जात नाही.... दररोज जवळपास 20 हजार लोक इथं जेवतात. राजकीय आखाड्यात आमची ढवळाढवळ नाही, असं मठातून नेहमी सांगितलं जातं... पण

या मठाचा आशीर्वाद ज्याला मिळतो, त्याला सत्तेचा मार्ग सुकर होतो.... हे सगळ्याच राजकीय नेत्यांना माहीत आहे.