Indigo Flight Heavy Air Turbulence left passangers terrified : विमान प्रवासाला निघालं असताना या प्रवासाची जितकी उत्सुकता असते तितकीच धास्ती किंवा काहीशी भीतीसुद्धा पाहायला मिळते. हा प्रवास व्यवस्थिचत व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मागील काही दिवसांपासून सातत्यानं विमान प्रवासादरम्यान घडणाऱ्या काही अप्रिय घटनांमुळं या भीतीमध्ये आणि चिंतेमध्ये भर पडली आहे. त्यातच नुकतीच भारतात अनेकांचीच पसंती असणाऱ्या आघाडीच्या विमानसेवा पुरवणाऱ्या एका कंपनीच्या विमानाला प्रवासादरम्यान अशाच एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागल्यामुळं अनेकांनाच धडकी भरली आहे.
इंडिगोच्या राजस्थानातील जोधपूर ते जयपूरदरम्यानच्या एका फ्लाईटमध्ये एक वेळ अशी आली जेव्हा प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास केला. अनेकांना त्या क्षणी नेमकं काय घडलं हेसुद्धा कळेना. इंडिगोच्या जोधपूरहून जयपूरला निघालेल्या फ्लाईट 6E-7406 च्या उड्डाणादरम्यान या विमानाच्या लँडिंगमध्ये खराब हवामानामुळं प्रचंड अडचणी आल्या.
विमानाच्या लँडिंगमध्ये येणाऱ्या अडचणींमुळं हे विमान साधारण 30 मिनिटं हवेतच घिरट्या घालत होतं. टर्ब्युलन्समुळं त्याला सातत्यानं गचके बसत होते. हा सर्व प्रकार प्रवाशांचा थरकाप उडवून गेला. विमानाला वारंवार टर्ब्युलन्समुळं हादरा बसत असल्यामुळं काही प्रवाशांचा धीर सुटला आणि त्यांना रडू आलं, काहींनी भीतीपोटी किंचाळण्यास सुरुवात केली. हा टर्ब्युलन्स इतका वाईट होता, की यापूर्वी कधीही प्रवाशांनी अशा परस्थितीचा सामना केला नव्हता. ज्यामुळं या घटनेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं.
प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा टर्ब्युलन्स इतका भयंकर होता, की प्रवाशांनी विमानात दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजन मास्कच्या बॅगही बाहेर काढल्या होत्या. कालांतरानं परिस्थिती नियंत्रणात आली आणि अखेर या विमानातं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. ज्यावेळी विमान लँड झालं, तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
प्राथमिक माहितीनुसार या विमानाचं निर्धारित वेळात टेकऑफ झालं नव्हतं. फ्लाइट 6E-7406 नं सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी उड्डाण घेत 1 तास 15 मिनिटांच्या प्रवासानंतर 12.20 वाजता जयपूरला पोहोचणं अपेक्षित होतं. पण, हवामान बिघाडामुळं हे विमान 12 वाजून 2 मिनिटांनी निघून दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी लँड झालं. दरम्यानच्या काळातच विमानानं भीषण परिस्थितीचा सामना केला.
दरम्यान, अशी कोणतीही परिस्थिती ओढावली असता विमानातील क्रू मेंबर्स प्रवाशांची सर्वतोपरी मदत करण्यास सक्षम असतात. अशा वेळी त्यांना प्रवाशांनी सहकार्य करणं अपेक्षित असतं. राहिला प्रश्न टर्ब्युलन्सचा, तर याचा अर्थ हवेचा एक अस्थिर आणि प्रचंड झोत ज्याचा वेग आणि भाराचा अंदाज वैमानिकांनाही येत नाही. हवामानात होणारा बिघाड किंवा अचानक येणाऱ्या वादळामुळं ही परिस्थिती तयार होते असं म्हटलं जातं. सर्वाधिक भयंकर टर्ब्युलन्स तेव्हा येतो ज्यावेळी आकाश निरभ्र असून, कोणत्याही धोक्याची पूर्वसूचना नसते. अशा वेळी विमान हवेत अतिशय उंचावर असतं आणि त्यातच टर्ब्युलन्ससम परिस्थिती ओढावल्यास वैमानिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.