Video : संसदेत घुमला विठूनामाचा गजर; श्रीकांत शिंदे यांच्याकडून पांडुरंगाचा जयघोष

Ashadhi Ekadashi 2024 : पंढरपूरच्या विठुरायाची भेट घेण्यासाठी आता वारकरी उत्सुक झाले असून, ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अगदी नेतेमंडळंवरीही हाच उत्साह स्वार झाल्याचं पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 1, 2024, 10:57 PM IST
Video : संसदेत घुमला विठूनामाचा गजर; श्रीकांत शिंदे यांच्याकडून पांडुरंगाचा जयघोष title=
shivsena mp shrikant shinde vitthal gajar in loksabha session watch video

Ashadhi Ekadashi 2024 : लाडक्या विठुरायाच्या भेटीची इच्छा मनात ठेवून अनेक मैलांची पायपीट करणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह आषाढी एकादशी जसजशी जवळ येईल तसतसा शिगेला पोहोचणाल आहे. सावळ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहण्यासाठी सारा वारकरी संप्रदाय सज्ज होत असतानाच आता वारीचे हे मंगलमय वारे राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहे. थेट दिल्लीपर्यंत पंढरपूरच्या वारीची महती पोहोचली असून, नेतेमंडळींनीही विठू नामाचा गजर केला आहे. 

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती याचं अनोखं रुप. सोमवारी संसदेत पांडुरंगाच्या नामाचा असाच अविरत गजर पाहायला मिळाला. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पांडुरंगाच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात केल्यामुळे विठू नामाचा गजर संसदेत पाहायला मिळाला. यावेळी तिथं उपस्थित इतर खासदारांनीसुद्धा विठ्ठल नामाचा घोष केला आणि वातावरण पुरतं बदलून गेलं. 

कुठवर पोहोचली वारी..... ? 

पंढरीच्या दिशेनं निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम उरकून पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला. पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले वारकरी आणि त्यांना निरोप देण्यासाठी गोळा झालेले पुणेकर याप्रसंगी भक्ती रसात न्हाऊन निघाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी पुण्यात दाखल झाला होता. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात ज्ञानोबांचा तर निवडुंग्या विठोबा मंदिरात तुकोबारायांचा मुक्काम होता. आषाढी वारीसाठी निघालेल्या संतजनांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी रांगा लावल्या होत्या.

हेसुद्धा वाचा : फक्त टेंशन नव्हे, तर 'या' क्षुल्लक कारणामुळं वाढतोय High BP चा धोका 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

पालखी सोहळ्यात दाखल झालेल्या हजारो दिंड्या शहराच्या विविध भागात विखुरल्या होत्या. त्या आज पुन्हा एकवटल्या आणि पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्या. पुण्यनगरीत दोन दिवस एकत्र घालवल्यानंतर हडपसरच्या नाक्यावर दोन्ही पालख्या दोन वेगळ्या मार्गांनी पंढरपूर कडे रवाना होतात. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुढचा मुक्काम लोणी काळभोरला असणार आहे. तर ज्ञानोबांची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. हिरवाईने नटलेल्या दिवे घाटाचा प्रवास वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असतो. ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष आणि विठू नामाचा गजर करत वारकऱ्यांचा भक्ती सागर पुढच्या गावी जाऊन विसावतो.