Shivaji Maharajs Mavla Salary: छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती हे मराठा साम्राज्याचे पहिले संस्थापक होते. ते रयतेचे राजा म्हणून ओळखले जायचे. दरम्यान शिवाजी महाराजांकडे असलेल्या मंत्र्यांना, सरदार, शिपाई, मावळ्यांना किती पगार मिळत असेल तुम्हाला माहिती आहे का?
छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मावळे सैन्यात भरती होण्यास आतुर असतं. परिस्थिती कोणतीही असो महाराज मावळ्यांचे पगार वेळेवर करत असत. नेहमी ठरलेल्या तारखेला पगार मिळत असे. एखादी मोहिम असेल तर महाराज 4 महिन्याचा अगाऊ पगार सैनिकांना देत असतं. सैनिकांच्या कुटुंबाचे हाल होऊ नयेत, यासाठी ही काळजी घेत असत. आता आपल्याला मिळणारा पगार हा रुपयाच्या स्वरुपात मिळतो. पण त्याकाळात तो होनच्या स्वरुपात दिला जायचा. सर्वप्रथम आजच्या रुपयानुसार त्यावेळच्या होनची किंमत समजून घेऊया मग तुम्हाला त्यावेळी मिळणाऱ्या पगाराचा अंदाज लावता येईल.
1 होन म्हणजे आताचे सरासरी 3 ग्रॅम सोनं असा अंदाज लावला जातो. म्हणजे आजच्या हिशोबाने 1 होनाची किंमत 6 हजार 200 इतकी आहे. आता आजच्या तारखेनुसार त्यांना किती पगार मिळायचा हे समजून घेऊया. त्याकाळी बहुतांश पगार हे वार्षिक स्वरुपात दिले जायचे. एका उदाहरणाने त्यावेळच्या पगाराची आजच्या पगाराशी तुलना करुया. स्वराज्यात काम करणाऱ्या हवालदाराला 125 होन वार्षिक पगार मिळायचा. 125 होन प्रमाणे आजचे वार्षिक 7 लाख 75 हजार इतका पगार होतो. म्हणजेच एका हवालदाराचा महिन्याचा पगार अंदाजे 64 हजार 583 इतका होता. आपलं स्वराज हे इतकं श्रीमंत होतं. आणि ते चालवणारा राजा किती श्रीमंत मनाचा होता, हे आपल्याला कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारातून लक्षात येईल.
प्रशासकीय खर्चामध्ये मंत्री आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. त्यांचे पगार वार्षित स्वरुपातील असतं. मुख्य प्रधानास वार्षिक वेतन 15 हजार होन, आमत्य- वार्षिक 12 हजार होन, इतर 6 प्रधानांना वार्षिक 6 हजार होन, चिटणीस- 6 हजार होन वार्षिक, फडणीस- 2 हजार होन वार्षिक, कारभारी- 100 ते 500 होन वार्षिक, सुभेदार- 400 होन वार्षिक पगार मिळत असे. तसेच सुभेदारास पालखीचा मानदेखील मिळत असे. सुभाक कारकूनास-400 वार्षिक होन मिळत असतं. पण त्यास पालखीचा मान नसे. मुजूमदारास वार्षिक 100 ते 125 होन पगार मिळत असे.
लष्करी खर्चाबद्दल जाणून घेऊया. महाराजांच्या घोडदळ असलेल्या सरनोबतास वार्षिक 5 हजार होन, पंचहजारी सरदारास 2 हजार होन वार्षिक, एकहजारी सरदारास 1 हजार होन, जुमलेदारास 500 होन वार्षिक, हवालदार- 125 होन वार्षिक, बारगिरास 9 होन वार्षिक होन पगार मिळत असे.
पायदळामध्ये सप्तहजारी सरदारास 1 हजार होन वार्षिक, एक हजारी सरदारास 500 होन वार्षिक, जुमलेदारास 100 होन मिळत, सामान्य शिपायास प्रति महिना 3 होन मिळत, कारभाऱ्यास कामानुसार वार्षिक जास्तीत जास्त 500 होन इतका पगार असेल.
आरमारात 4000 जहाजे होती. इथला पगार बाहेरच्या बाहेर भागवण्यात यायचा. सागरी मार्गातून होणारा व्यापार, जकात तसेच खंडणी यातून जमा झालेली रक्कम पगारासाठी वापरली जायची. विशेष कामगिरी करणाऱ्यांना हत्ती, घोडा असा मौल्यवान पुरस्कार दिला जायचा. जखमींना औषधोपचार दिला जायचा.
गुप्तहेर खाते हे छत्रपती शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जायचे. शिवाजी महाराज गुप्तहेर खात्याला सर्वाधिक पगार द्यायचेय. महाराजांच्या गुप्तहेर खात्याची माहिती कधीच कोणाला मिळायची नाही. त्यांचा पगार किती, ठाव ठिकाणा काय? हे कोणाला काळायचे नाही. साधारण 1630 ते 1680 हा तो काळ होता. त्याकाळी नाणी सोने, चांदी, मोती अशा मौल्यवान वस्तू बक्षिस म्हणून दिल्या जात असतं.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)