तिरुवनंतपुरम: मला आज सेंच्युरी करूनही टीम हारलेल्या बॅटसमनप्रमाणे वाटतेय, अशी प्रतिक्रिया तिरुवनंतपुरम मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार शशी थरुर यांनी व्यक्त केली. शशी थरुर यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) के. राजशेखरन यांचा ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपप्रणित एनडीएने ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ३०० पेक्षा अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पाच वर्षांची टर्म पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. तर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) १०० पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शशी थरुर यांनी म्हटले की, माझ्या मतदारसंघात ७२ टक्के मतमोजणी पूर्ण झाली असून माझ्याकडे ७२ हजारांचे मताधिक्य आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा कडुगोड असा संमिश्र अनुभव आहे. मला आज सेंच्युरी करुनही टीम हारलेल्या बॅटसमनप्रमाणे वाटतेय, असे थरुर यांनी म्हटले.