भोपाळ : मध्यप्रदेशमधील भिंड येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. बँकेच्या एका चुकीमुळे दोन व्यक्तींना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. बँकेकडून एकाच नावाच्या दोन व्यक्तींचं खातं, एकाच नंबरवर उघडण्यात आलं. एक व्यक्ती बँकेत पैसे भरत होता तर, दुसरा व्यक्ती पैसे काढत होता. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर, पैसे काढणाऱ्या व्यक्तीने, मला वाटतं होतं की, मोदी सरकार माझ्या खात्यात पैसे टाकत आहे आणि मी माझ्या गरजेनुसार पैसे काढत असल्याचं तो म्हणाला.
ही संपूर्ण घटना भिंड, आलमपूरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील आहे. एसबीआयमध्ये खातं असणारे हुकुम सिंह कुशवाह शिक्षित नाहीत. ते कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी हरियाणामध्ये पाणीपुरीची गाडी लावतात. २०१६ मध्ये त्यांनी आलमपूरमधील स्टेट बँकेत खातं सुरु केलं. त्यांच्या दोन वर्षांनंतर हुकुम सिंह बघेल (पैसे काढणारे) यांनी याच शाखेत खातं सुरु केलं. बँकेच्या निष्काळजीपणामुळे दोन व्यक्तींना एकचं खातं क्रमांक देण्यात आला.
हुकुम सिंह कुशवाह (पैसे भरणारे) बँकेत खातं सुरु करुन रोजगारासाठी हरियाणात गेले. ज्यावेळी ते घरी यायचे, कमाईतील काही पैसे बँकेत जमा करत होते. तर दुसरीकडे हुकुम सिंह बघेल (पैसे काढणारे) बँकेतून पैसे काढण्याचं काम करत होते.
हुकुम सिंह कुशवाह (पैसे भरणारे) एक प्लॉट घेण्याच्या विचारात असताना १६ ऑक्टोबर रोजी त्यांनी बँकेत जाऊन खात्याची स्थिती पाहिली आणि हैराण झाले. त्यांनी आतापर्यंत १ लाख ४० हजार रुपये जमा केले होते, ज्यापैकी केवळ ३५ हजार ४०० रुपये शिल्लक राहिले होते.
याप्रकरणाची बँक मॅनेजरकडे तक्रार करण्यात आली. पण बँकेकडून त्यांचं म्हणणं ऐकून न घेता, ही बाब दाबण्याचा प्रयत्न केला गेला.
दुसरीकडे, हुकुम सिंह बघेल (पैसे काढणारे) यांच्या चौकशीनंतर त्यांनी, मी माझ्याच खात्यातून पैसे काढले असल्याचं सांगितलं. मी परत का करु? मला वाटलं, मोदी सरकार खात्यात पैसे जमा करत आहे. म्हणून मी पैसे काढून ते खर्च केले, असं म्हटलंय.
बँक व्यवस्थापक राजेश सोनकर यांनी, हुकुम सिंह कुशवाह यांना त्यांचे पैसे परत करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं. आता हुकुम सिंह कुशवाह यांचे पैसे परत मिळणार का? की बँकेच्या फेऱ्या घालाव्या लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.