मुंबई : जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेतून होम लोन घेतलं आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पण तुम्ही जर या बँकेत कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट केलं आहे तर मग तुमची निराशा होऊ शकते. कारण एसबीआयने मंगळवारी मार्जिन कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 35 बेसिस प्वाइंट्स म्हणजेच 0.35 टक्के घट केली आहे. हे नवे दर 10 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
या सोबतच बँकेचा एक वर्षाचा एमसीएलआर 7.75 टक्क्यावरुन 7.40 टक्के झाला आहे. याचा सर्वाधिक फायदा होम लोनच्या ग्राहकांना होणार आहे. या शिवाय इतर रिटेल लोन ग्राहकांना देखील याचा फायदा होणार आहे.
SBI च्या या निर्णय़ानंतर ३० वर्षासाठी जर लोन घेतलं असेल तर एका लाखावर प्रति ईएमआय 24 रुपयांनी कमी होणार आहे. म्हणजेच जर कोणी 30 वर्षासाठी ३० लाखाचं लोन घेतलं आहे तर त्याच्या ईएमआयमधून 720 रुपये कमी होणार आहे.
SBI ने सगळ्या रिटेल आणि जमा असलेल्या रक्कमेवरील व्याजदर 0.20 टक्क्यांनी कमी केले आहेत. सेविंग अकाउंटमध्ये १ लाखापर्यंतच्या जमा असलेल्या रकमेवर ३ टक्के व्याज मिळेल. तर एक लाखाहून अधिकच्या रकमेवर 2.75 टक्के व्याज मिळेल. हा निर्णय १५ एप्रिलपासून लागू होईल.
आरबीआयने 27 मार्चला मॉनेटरी पॉलिसी रिव्यूची घोषणा करताना रेपो रेटमध्ये 0.75 टक्क्यांनी घट केली होती. त्यानंतर SBI ने व्याजदरांमध्ये 0.75 टक्क्यांनी घट केली होती.