'शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण' : संजय राऊत

विरोधी पक्षांची एकजूट होणं हे काँग्रेसशिवाय अशक्य असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे

Updated: Jul 28, 2021, 04:07 PM IST
'शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण' : संजय राऊत title=

नवी दिल्ली : 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधकांचे भीष्म पितामह आहेत, त्यांच्या सल्ल्यानेही अनेक गोष्टी विरोधी पक्षाच्या राजकारणात घडतात. तर ममता बॅनर्जी या राष्ट्रीय आकर्षण आहेत' असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. विरोधी पक्ष कमजोर झाला तर लोकशाही कमजोर होईल. अनेकदा प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्व केलंय, असंही ते म्हणाले.  

विरोधी पक्षांची एकजूट होणं हे काँग्रेसशिवाय अशक्य आहे. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण, आदानप्रदान यासाठी या भेटीगाठी आवश्यक आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालची निवडणूक ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे जिंकली त्यामुळे त्यांच्याकडे राष्ट्रीय आकर्षण म्हणून पाहिलं जातं आहे. ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी भाजपने सत्ता संपत्ती तपास यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. याचं कौतुक पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनाही असेल. ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण ठरल्या आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 

'उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही', असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता, यावर बोलताना संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.