नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांतील पराभवाचं चिंतन करण्याऐवजी आमचा नेताच पळून गेला, हेच काँग्रेसच्या पिछाडीचे मुख्य कारण आहे, अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केलीय. ते नवी दिल्लीत बोलत होते. लोकसभा निवडणुकांच्या पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर नेते आणि कार्यकर्ते य़ांच्यापासूनही ते दूरच राहिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पराभवाचं चिंतनच होवूच शकलं नाही अशी खंतही खुर्शीद यांनी व्यक्त केली. राहुल गांधी सक्रीय नसल्याने सोनिया गांधी यांना ही जबाबदारी घ्यावी लागली. मात्र ही केवळ तात्पुरती व्यवस्था असल्याचंही त्यांनी म्हटलं. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला हवी, त्यानंच काँग्रेस पक्षाला उभारी येईल, असंही खुर्शीद यांनी म्हटलं आहे.
पहिल्यांदाच काँग्रेस नेत्याकडून राहुल गांधी यांनी जबाबदारी झटकल्याचं वक्तव्य केलं गेलं आहे. खुर्शीद यांनी म्हटलं की, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर एक पोकळीक निर्माण झाली.
माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी पुढे म्हटलं की, राहुल गांधी यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी पदावर कायम राहिलं पाहिजे होतं आणि नेतृत्व करायला हवं होतं. कार्यकर्त्यांना देखील हेच वाटतं.'
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कार्यकर्ते आणि काँग्रेस नेत्यांनी आग्रह केल्यानंतर ही त्यांनी पुन्हा पद स्विकारलं नव्हतं.