Jaishankar Called PM Modi As Captain: देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या (PM Modi) कार्यकाळात भारताचं परराष्ट्र धोरण समजावून सांगताना क्रिकेटशी (Cricket) संबंधित एक उदाहरण दिलं. भारत आणि ब्रिटनच्या संबंधांबद्दल भाष्य करताना जयशंकर यांनी जगभरामध्ये चर्चेत असलेल्या 'आरआरआर' (RRR) या चित्रपटाचा उल्लेख केला. देशाची राजधानी दिल्लीमध्ये रायसीना डायलॉग कार्यक्रमामध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'कर्णधार' असा केला. 'कर्णधार' मोदी त्यांच्या गोलंदाजांना स्वत:च्या नियोजित काळमर्यादेपर्यंत पूर्ण स्वातंत्र्य देतात, असं सूचक विधान जयशंकर यांनी केलं. जयशंकर यांच्याबरोबरच ब्रिटनचे माजी पंतप्रदान टोनी ब्लेअर आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनही मंचावर उपस्थित होते.
परराष्ट्र मंत्र्यांनी मोदींच्या कामासंदर्भात भाष्य करताना, "कर्णधार (पंतप्रधान) मोदींबरोबर फार जास्त वेळ नेट प्रॅक्टिस करावी लागते. नेट प्रॅक्टिस पहाटे सहा वाजता सुरु होते. ती प्रॅक्टिस फार वेळ चालते. त्यांची तुमच्याकडू अपेक्षा असते की ते तुम्हाला संधी देत असतील तर तुम्ही ती विकेट मिळवली पाहिजे," असं म्हटलं. तसेच पुढे, "जर तुमच्याकडे एखादा खास गोलंदाज आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास करता आणि त्याचवेळी तो चांगली कामगिरी करत असेल तर योग्य वेळी तुम्ही त्याच्या हाती चेंडू सोपवता. कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेऊ शकता. मला वाटतं याच प्रकारे कर्णधार मोदी आपल्या गोलंदाजांना एका निश्चित काळमर्यादेपर्यंत स्वातंत्र्य देतात. त्यांची तुमच्याकडून अपेक्षा असते की तुम्हाला संधी देण्यात आली आहे तर तुम्ही विकेट मिळवावी. मात्र यामध्ये काही कठीण निर्णयही वेळोवेळी घ्यावे लागले. लॉकडाउनचा निर्णय फार मोठा निर्णय होता. पण तो निर्णय घ्यावाच लागला," असंही जयशंकर म्हणाले. "आज आपण मागे वळून पाहिल्यास तो निर्णय घेतला नसता तर काय झालं असतं याचा अंदाज बांधता येतो," असं सूचक विधान जयशंकर यांनी केलं.
भारत हा ब्रिटनपेक्षा मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे तसेच भारतीयांना क्रिकेटबद्दल फार प्रेम आहे यासंदर्भातही जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आले. "मी याला पुन्हा संतुलित होणं असं म्हणेन. हा इतिहासाचा स्विच-हिंटिंग आहे. याचा परिणाम फक्त दुसऱ्या बाजूने होत आहे. भारत एका असामान्य स्थितीमध्ये आहे. भारत पुन्हा निर्णयाक स्वरुपात पुढे वाटचाल करत आहे. अशीच वाटचाल करण्याच्या स्थितीत सध्या इतर अनेक देश नाहीत," असंही जयशंकर यांनी म्हटलं. "मागील वर्षी भारतामधील सर्वात लोकप्रिय चित्रपट 'आरआरआर' हा होता. याचा संबंध ब्रिटीश कालावधीशी आहे. सांगायचं हे आहे की तुमचा इतिहास जेवढा गुंतागुंतीचा असतो तितकाच त्याचा एक नकारात्मक पैलूही असतो. यासंदर्भातील शंका आणि न सुटलेली कोडीही तितकीच असतात," असं मत जयशंकर यांनी नोंदवलं.
#WATCH | EAM Dr S Jaishankar invokes Cricket analogy, says, "With Captain (PM) Modi the net practice starts 6 in the morning and goes on till fairly late...He expects you to take that wicket if he gives you the chance to do it." pic.twitter.com/zKh1XoRAiq
— ANI (@ANI) March 3, 2023
परराष्ट्र संबंधांमध्ये आज सर्वांना रस निर्माण होण्यामागे भारताचे जागतिकीकरण होत असल्याचं कारण आहे असंही जयशंकर म्हणाले. "असं यामुळे आहे कारण सध्या जग एका कठीण जागी आहे. अनेक लोक जगभरातील घडामोडींमध्ये रस घेत आहेत दुसरं कारण भारताचं जागतिकीकरण होत आहे. एखाद्या क्रिकेट टीमप्रमाणे आम्ही केवळ घरच्या मैदानांवर नाही तर परदेशांमध्येही सामने जिंकू इच्छितो," असं जयशंकर म्हणाले.