नवी दिल्ली : स्थानिकांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर नोएडामधील पार्कमध्ये नमाज पठणावर बंदी आणली गेली. यानंतर तिथलं वातावरण चांगलंच तापले आहे. आता तर यावरून राजकारणही सुरू झाल्याचे पाहायला मिळते आहे. पोलिसांच्या सुचनेनंतर नमाजासाठी पार्कमध्ये एकत्र न येण्याचे आवाहन करण्यात आले. खुल्या जागेत परवानगी शिवाय धार्मिक कार्यक्रम होणे या गोष्टीला स्थानिकांचा आक्षेप होता. आता या ठिकाणी नमाज पठण होत नाही. पण या नमाज पठण बंदीची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांशी करण्यात आली आहे. संघाच्या शाखांधील साहसी खेळ हे खुल्या मैदानात होत असतात. याचा संदर्भ घेत कॉंग्रेस नेता संपूर्णानंद यांनी डीजीपीला पत्र लहून राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ''सर्वांसाठी वेगवेगळे नियम का ? जर उघड्यावर नमाजाला बंदी आणली जाऊ शकते तर संघाच्या शाखांना हा नियम का लागू होत नाही ?'' असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सपूर्णानंद हे उत्तर प्रदेशच्या कॉंग्रेस विचार शाखेचे विभाग प्रमुख आहेत.
Sampooranand,UP Congress: Have written to a letter to DGP, why does the rule not apply to RSS Shakhas, why only Namaz not allowed in public places? This was an unnecessary order from UP administration. It is about rule of law pic.twitter.com/eBMjMcFcyq
— ANI UP (@ANINewsUP) December 28, 2018
नोएडा सेक्टर 58 मधीस पार्कमध्ये नमाज पठण केला जायचा. जवळच्या इंडस्ट्रीतले कर्मचारी इथे नमाज पठणासाठी येत असत. याचा तिथल्या स्थानिकांना त्रास व्हायचा. त्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत इथे नमाज पठण करण्यास बंदी घातली. इंडस्ट्रीयल सेक्टरला नोटीस पाठवून ऑफिसात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पार्कमध्ये नमाज न पाढण्याचे आदेश दिले. उघड्यावर नमाज पठणासाठी परवानगी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नोएडा सेक्टर 58 च्या इंडस्ट्रीयल हबमधील ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही तर त्यांच्या कंपनी यासाठी जबाबदार धरले जाणार आहे. हे पार्क यंत्रणेच्या मालकीचे आहे. जर कोणी धार्मिक कार्यासाठी किंवा कोणत्याही धर्मासाठी याचा वापर करत असेल तर त्याची परवानगी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.