मुलांच्या संगोपनासाठी पुरूष कर्मचाऱ्यांना सुट्टी

 पुरूष कर्मचाऱ्यांना मुलांच्या देखरेखीसाठी एकूण सेवा कार्यामध्ये 730 दिवसांची सुट्टी

Updated: Dec 28, 2018, 03:46 PM IST
मुलांच्या संगोपनासाठी पुरूष कर्मचाऱ्यांना सुट्टी  title=

नवी दिल्ली : येणाऱ्या वर्षात सर्वच क्षेत्रातून जनतेसाठी आनंदाची बातमी मिळतेय. कोणाला तिकिटात सवलत मिळणार आहे तर कुठे गरजेच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. रेल्वे, अर्थ मंत्रालय अशा सर्वांनीच नागरीकांना नववर्षात गिफ्ट दिले आहेत. केंद्र सरकारनेही पुरूष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. नव्या नियमानुसार केंद्र सरकारच्या अख्त्यारीत काम करणाऱ्या पुरूष कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी सुट्टी मिळणार आहे. आतापर्यंत मुलांच्या संगोपनाची सुट्टी महिलांना मिळत होती. पण आता पुरूष कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यकाळात एकूण 730 दिवसांची चाईल्ड केअर लीव्ह (CCL) मिळू शकते. एवढंच नव्हे तर ही सुट्टी भर पगारी असणार आहे. या सुट्टी दरम्यानचा पगारही पुरूष कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.  याआधी हा नियम केवळ महिलांनाच लागू होता.

80 टक्के पगार

याआधी असलेल्या नियमानुसार महिला सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात 3 सीसीएल मिळत. दोन मुलांपर्यंत या सुविधेचा लाभ त्यांना मिळतो. पण पुरूषांसाठी अशी काही व्यवस्था नव्हती. एकल पुरूष पालकत्व असणाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी महिलांप्रमाणे या सेक्शनमध्ये ठेवण्यात आले आहे.

नियमानुसार 730 मधील 365 दिवसांची सुट्टीसाठी 100 टक्के पगार मिळेल. तर इतर  365 दिवसांसाठी 80 टक्के पगार मिळेल.

पगार कपात नाही 

सीसीएल व्यतिरिक्त महिला 180 दिवसांच्या 'पेड मेटरनिटी लीव्ह' घेऊ शकतात आणि पुरूष वडील बनल्यानंतर 15 दिवसांची सुट्टी घेऊ शकतात. यासाठी त्यांच्या पगारात कोणती कपात होणार नाही. ऑर्गनाइस सेक्टरमध्ये मॅटरनिटी लीव्ह 26 आठवडे वाढवण्यात आली आहे.

'DoPT च्या आदेशानुसार एक महिला सरकारी कर्मचारी आणि एकल पुरूष कर्मचाऱ्यांना मुलांच्या देखरेखीसाठी एकूण सेवा कार्यामध्ये 730 दिवसांची सुट्टी दिली जाऊ शकते. मुलांचे शिक्षण, आजारपण अशा कारणांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो.