४ महिन्यानंतर सुरु झाला लद्दाख आणि भारताला जोडणारा एकमेव रस्ता

भारतीय जवानांच्या प्रयत्नांनी रस्ता पुुन्हा सुरु

Updated: Apr 11, 2020, 11:15 PM IST
४ महिन्यानंतर सुरु झाला लद्दाख आणि भारताला जोडणारा एकमेव रस्ता title=

लद्दाख: कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये बंद आहे. पण अशा वेळीसुद्धा लष्कराचे जवान देशाच्या बचावासाठी ठामपणे उभे आहेत. श्रीनगर ते लेह जोडणारा 425 किलोमीटरचा मोक्याचा रस्ता उघडण्यासाठी सैन्याने दिवसरात्र मेहनत घेतली. लद्दाख आणि भारताला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे जो डिसेंबरपासून हिमवृष्टीमुळे बंद झाला होता.

शनिवारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या टीमने म्हणजेच बीआरओच्या प्रोजेक्ट बीकन आणि प्रोजेक्ट विजयक यांच्या पथकाने संयुक्तपणे साडे अकरा हजार फूट उंचीवर झोजिला खिंडीचा बर्फ कापून हा रस्ता खुला केला आहे. हा रस्ता केवळ रणनीतीकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर लडाखच्या लाखो रहिवाशांना जगाशी जोडणारा एकमेव मार्ग आहे.

1999 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी हा रस्ता तोडून पाकिस्तानला लद्दाख सियाचीनला भारतापासून वेगळे करायचे होते. हा रस्ता वर्षाकाठी सुमारे 5 महिने मुसळधार हिमवृष्टीमुळे बंद राहतो. हा रस्ता गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंद करण्यात आला होता. हा रस्ता बंद झाल्यानंतर लद्दाखशी संपर्क साधण्यासाठी फक्त हवाई मार्ग खुला राहतो.

शनिवारी द्रास येथील प्रोजेक्ट विजयक आणि श्रीनगरच्या वतीने प्रोजेक्ट बीकनच्या पथकाने झोजिला पासच्या बर्फातून मार्ग मोकळा करून रस्ता उघडला. रस्ता सुरू होताच 18 तेलाच्या टँकर व इतर वस्तूंनी भरलेल्या ट्रक लेहकडे पाठविण्यात आले. कोरोना विषाणूमुळे या ड्रायव्हर्स व इतर वस्तूंची तपासणी करण्यात आली.