Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेटचा संघाचा (Team India) धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला भीषण अपघात (Accident) झाला. आईला सरप्राईज देण्यासाठी घरी जात असलेला ऋषभ पंत अपघातात जखमी झाला आहे. दिल्ली-देहरादून महामार्गावर (Delhi Dehradun Expressway) त्याची कार डिवायडरला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने ऋषभ पंत जखमी अवस्थेतच गाडीच्या बाहेर पडल्याने त्याचा जीव बचावला.
कोणत्या गाडीने ऋषभ प्रवास करत होता
ऋषभ पंत ज्या कारने प्रवास करत होता ती कार होती Mercedes-AMG GLE 43 4MATIC Coupe. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Roads and Transport) दिलेल्या माहितीनुसार या कारची नोंदणी 25 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती आणि ऋषभ पंतच्याच नावावर कार आहे. यंदाच्या वर्षातला मर्सिडिज बेंज (Mercedes Benz) या महागड्या कारचा हा दुसरा मोठा अपघात आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रस्ते अपघातात निधन झालं. मिस्त्री Mercedes Benz GLC 220 D 4MATIC या कारने प्रवास करत होते.
सायरस मिस्त्रिंचा मृत्यू कशामुळे?
सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांची मर्सिडिज बेंझ मुंबईतील गायनकोलॉजिस्ट अनाहित पंडोले या चालवत होत्या. त्यांच्या बाजूला त्यांचे पती डेरियस पंडोले बसले होते. तर कारच्या मागच्या सीटवर सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशॉ बसले होते, आणि त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. या दोघांच्या मृत्यूचं हेच मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे. अनाहित आणि डेरियस यांनी सीट बेल्ट लावला होता, त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
ऋषभ पंतचा अपघात कसा झाला?
ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. आपल्या आईला भेटण्यासाठी तो रुडकीला जात होता. कार चालवताना त्याचा डोळा लागला आणि कार डिवाइडरला आदळली. ऋषभ पंतला उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. त्याच्या डोक्याला, पाठिला आणि पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कार जळून खाक, कसा वाचला पंत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतची कार डिवायडरला धडकली आणि कारने पेट घेतला. यात कार पूर्णपण जळून खाक झाली. सुदैवाने ऋषभ पंत लागलीच कारच्या बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. हरियाणा रोडवेजची एक बस त्या मार्गावरुन प्रवास करत होती, त्या बसच्या ड्रायव्हरने ऋषभ पंतला कारबाहेर पडण्यास मदत केली.
कारला आग कशी लागली?
अपघाताचं सीसीव्ही फूटेज समोर आलं आहे. यात कारचा अपघात किती भीषण होता याचा अंदाजा येतो. पण कारला आग कशी लागली याबाबत अजून ठोस माहिती मिळालेली नाही. कार प्रचंड वेगाने डिवायडरला धडकली, ज्यामुळे इंधन गळती झाली असावी आणि त्यामुळे आग लागल्याची शक्यता तज्ञ्जांनी व्यक्त केली आहे.
मर्सिडीजच्या सेफ्टी फिचर्सवर प्रश्न
आधी सायरस मिस्त्री आणि आता ऋषभ पंत यांच्या अपघातानंतर मर्सिडीज बेंझच्या सेफ्टी फीचर्सवर प्रश्न उपस्थित केले जात असले तरी या कारची गणना अत्यंत सुरक्षित कारमध्ये केली जाते.