मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, असा प्रश्न केल्यास काही नावं हमखास समोर येतात. टाटा, बिर्ला, अंबानी हीच ती नावं. मुळात हासुद्धा काही प्रश्न आहे का, असंही तुम्हाला काहीजण म्हणतील. मुळात या व्यक्तींची व्यवसाय क्षेत्रातील कामगिरी आणि त्यातही त्यांच्या उत्पन्नाचा आकडा पाहता हेच देशातील श्रीमंत व्यक्ती आहेत यात वाद नाही.
पण, यामध्ये काही नावं अशीही आहेत ज्यांना विसरुन चालणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात असणाऱ्या विविध राजवटींमध्ये काही राजे असेही होते ज्यांची श्रीमंती भल्याभल्यांना लाजवणारी होती.
या सर्व राजांच्या यादीमध्ये मिर उस्मान अली खान, अर्थात हैदराबादवर ज्यांनी 37 वर्षे राज्य केलं ते निजाम. 1911 पासून 1948 पर्यंत या निजामांनी हैदराबादवर राज्य केलं. हेच निजाम देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आज जगासमोर आले आहेत.
1948 मध्ये भारतीय लोकशाही अस्तित्वात आल्यानंतरच्या काळापूर्वी हैदराबादवर सत्ता असणाऱ्या निजाम मिर उस्मान अली खान हे तुमच्या कल्पनाशक्तीपलीकडेही कमाल श्रीमंत होते. 1911 ला ते आपल्या वडिलांच्या जागी गादीवर आले आणि जवळपास 4 दशकं त्यांनी साम्राज्याचा कारभार सांभाळला.
अगदी ताज्या आकडेवारीचा अंदाज घ्यावा तर, त्यावेळी मिर उस्मान अली खान यांचं वार्षिक उत्पन्न आर्थिक मंदीचा काळ वगळता 17.47 लाख कोटी रुपये Rs 1,74,79,55,15,00,000.00 अर्थात 230 बिलियन डॉलर्स इतकं होतं.
सध्याच्या घडीला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या टेस्ला आणि स्पेस एक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा 250 बिलियन डॉलर्स इतका आहे. त्या काळात निजामांचं उत्पन्न इतकं होतं म्हणजे पाहा किती ही श्रीमंती...
निजाम तेव्हाचे तरीही श्रीमंती आताही आघाडीवर कशी?
असं म्हणतात की निजाम पेपरवेटऐवजी एक मौल्यवान हिरा वापरत होते. त्यांची स्वत:ची बँक होती. हैदराबाद स्टेट बँक हीच ती बँक. ज्याची सुरुवात 1941 मध्ये अस्तित्वात आली होती. शौख बडी चीज होती है... असं म्हणतात. निजामांच्या बाबतीत हे पूर्णपणे लागू होतं.
त्यांना मिळालेल्या भेटवस्तूही प्रचंड महागड्या होत्या. असं म्हटलं जातं की राणी एलिझाबेथला तिच्या लग्नातही त्यांनी मौल्यवान खडे त्यांनी भेट म्हणून दिले होते.
आपल्या राजवटीमध्ये त्यांनी प्रांतात वीज, रेल्वे, रस्ते, शिक्षण अशा अनेक सुविधा आणल्या. निजामांनी त्यांच्या काळात केलेली आणि दाखवलेली श्रीमंती इतकी की आजमितीस ती घटलेली नाही. म्हणूनच आजही कोणी श्रीमंतीचा आव आणला तर, उपरोधिकपणे म्हटलं जातं... निजाम लागून गेलास का.....