भोपाल : देशात इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. भारतीय वाहन कंपन्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर लॉन्च करत आहेत. सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेलने बनवलेली इलेक्ट्रिक कार चर्चेचा विषय ठरीत आहे.
हिमांशूने ही इलेक्ट्रिक कार फक्त 2 लाख रुपये खर्चून बनवली आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 185 किमी प्रवास करते. हिमांशू सांगतात की, या कारला एकदा पूर्ण चार्ज करण्याची किंमत फक्त 30 रुपये आहे.
हिमांशू भाई पटेल यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कारबद्दल दावा केला आहे की ती धावत असतानाही चार्ज होत राहते. हिमांशू गांधीनगरमधील एका खासगी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.
हिमांशूची इलेक्ट्रिक कार रिमोटने सुरू होते. यासोबतच, त्यात दिलेल्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये स्पीड तसेच बॅटरीची स्थिती देखील सांगते. या कारमध्ये फास्ट चार्जही दिला जातो. ही कार पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 180 ते 240 मिनिटे लागतात.
या कारचा टॉप स्पीड 50 किमी प्रतितास आहे. यासोबतच रिव्हर्स टर्नही देण्यात आला आहे. या कारमध्ये सुरक्षा अलार्म देखील आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये MCB बॉक्सही बसवण्यात आला असून, तो कोणत्याही प्रकाराच्या बिघाडावर ट्रिप होईल.