नवी दिल्ली : घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारकडून घराच्या खरेदी व्यवहारावेळी भरावं लागणारा स्टँप ड्यूटी कमी करुन 3 टक्के करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता त्याच आधारे, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सर्वच राज्यांमध्ये याची अंमलबजावणी केली पाहिजे, असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात स्टँप ड्यूटी कमी केल्याच्या निर्णयानंतर, दुर्गा शंकर मिश्रा यांनी महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. लॉकडाऊन काळात जवळपास ठप्प झालेल्या रियल इस्टेट क्षेत्राला उभारी देण्यासाठी तसंच रियल इस्टेट क्षेत्रात मागणी वाढवण्यासाठी इतर राज्यांनाही स्टँप ड्यूटी कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने बुधवारी 1 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान घराच्या खरेदी व्यवहारादरम्यान लागू असणारा स्टँप ड्यूटी कमी करुन 3 टक्के केल्याची घोषणा केली. तर 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या काळात स्टँप ड्यूटी 2 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शहरी भागात स्टँप ड्यूटी 5 टक्के तर ग्रामीण भागात 4 टक्के आहे.
देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रियल इस्टेट क्षेत्रातील मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली. या काळात रखडलेले निवासी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 25000 कोटींच्या विशेष निधीतून 9300 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीस मान्यता देण्यात आली आहे. तसंच कोरोना संकटात रियल इस्टेटमधील कमी झालेल्या मागणीला पुन्हा गती देण्यासाठी राज्यांना स्टँप ड्यूटी कमी करण्याची सूचनाही मिश्रा यांनी दिली आहे.