अयोध्या रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, राम मंदिराप्रमाणे दिसणार

अयोध्या रेल्वे स्थानकासाठी 104 कोटी रुपये मंजूर

Updated: Aug 3, 2020, 10:26 AM IST
अयोध्या रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, राम मंदिराप्रमाणे दिसणार title=

अयोध्या : भगवान राम यांचे जन्मस्थान अयोध्या अनेक काळापासून भक्ती आणि श्रद्धेचं केंद्रबिंदू आहे. या शहराचे हे महत्त्व भाविकांना आपल्याकडे आकर्षित करते. दररोज जगभरातून भक्त येथे ये-जा करतात. हे लक्षात घेता, अयोध्येचे रेल्वे स्थानक देखील भारतीय रेल्वेसाठी एक विशेष स्थानक आहे. अयोध्या रेल्वे स्थानकावर दररोज अनेक गाड्या चालवल्या जातात. आता अयोध्येत राम मंदिर बनणार आहे, तर अयोध्या स्थानकाचा देखील कायापालट होणार आहे. या रेल्व स्थानकाला राम मंदिराच्या धर्तीवरच पुन्हा डिझाइन केले जाणार आहे. जून 2021 पर्यंत स्थानकाचे काम पूर्ण होईल.

रेल्वे विभागाच्या वतीने अयोध्या रेल्वे स्थानक, प्रवासी सुविधा, स्वच्छता, सौंदर्य आणि वेगवेगळ्या अत्यावश्यक सुविधांच्या रूपात मोठा बदल करून रेल्व स्थानकाला नवीन मार्गाने सजवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन आणि आधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज अयोध्या स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात या स्थानकासाठी 80 कोटी रुपये मंजूर झाले होते, आता ती वाढवून 104 कोटी करण्यात आले आहे. स्थानकाची इमारत रेल्वेची (आरआयटीईएस) कंपनी तयार करत आहे.

अयोध्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2/3 मध्ये विकास कामे, विद्यमान परिसंचरण क्षेत्र आणि धारण क्षेत्र विकसित केले जाईल. दुसर्‍या टप्प्यात नवीन स्टेशन इमारत व इतर सुविधांचे बांधकाम केले जाईल. या सुविधा स्थानकाच्या आत आणि बाहेरील भागात दिल्या जातील. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय तिकीट काउंटर, वेटिंग हॉल, वातानुकूलन 3 विश्रांती कक्ष, 17 बेडचे पुरुष वसतिगृह, 10 बेडची सुविधा असेलेले महिला वसतिगृह, अतिरिक्त फुट ओव्हर ब्रिज, फूड प्लाझा, दुकाने, अतिरिक्त शौचालय या सुविधांची संख्या वाढविण्याचे काम सुरु होणार आहे.

पर्यटक केंद्र, टॅक्सी बूथ, चाईल्ड केअर सेंटर, व्हीआयपी लाऊंज, सभागृह आणि व्हीआयपी गेस्ट हाऊस या सुविधा स्टेशनवर दिल्या जाणार आहेत. अयोध्या रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न होत आहेत अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय त्रिपाठी यांनी दिली.