Sovereign Gold Bond scheme : देशातील आर्थिक संस्थेतील परमोच्च संस्था आणि नियंत्रण मंडळ अशी ओळख असणाऱ्या आरबीआय अर्थात भारतीय रिजर्व्ह बँकेनं नागरिकांना कमी दरात सोनं खरेदी करण्याची मुभा दिली होती. 30 नोव्हेंबर 2015 पासून यासाठी आरबीआयनं सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond scheme) म्हणजेच सुवर्णरोखे ही योजना सुरु करण्यात आली होती. पण, आता मात्र ही सरकारी योजना बंद करण्यात येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आणि अनेकांच्याच नजरा वळल्या.
दरम्यान, सदर योजनेला बंद करण्याच्या कोणत्याही विचारात सरकार नसल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
अधिकृत अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2024 मध्ये पार पडणाऱ्या अधिकृत बैठकीमध्ये या योजनेत्या भवितव्यासंदर्भात चर्चा केली जाईल. केंद्र सरकारच्या लाभासमवेत सोन्याची मागणी कमी करण्याच्या रणनितीच्या दृष्टीनं ही योजना पुढे सुरु ठेवायची की नाही, यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
2024 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या तरतुदींनुसार सोन्यावरील आयात करामध्ये घट करत ही रक्कम 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणल्यानंतर आता सोन्याचे दर घटले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं सुवर्णरोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचंही नुकसान झालं असून, त्यांना मॅच्योरिटी स्वरुपात अतिशय कमी परतावा मिळत असल्याचं स्पष्टही झालं आहे. ज्यामुळं येत्या काळात ही योजना बंद करण्याचा विचार होऊ शकतो.
आतापर्यंत योजनेचा एक टप्पा मॅच्योर
नोव्हेंबर 2015 पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्याचा परतावा नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आला होता. गुंतवणुकदारांना हा परतावा चांगल्या स्वरुपात मिळाला असून, आता या योजनेच्या अंतिम परताव्याच्या स्वरुपात गुंतवणुकदारांना किती टक्के परतावा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.