मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांविषयीची तीव्र नाराजी व्यक्त करणाऱ्या सावरकर कुटुंबीयांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करून कारवाई करावी अशी मागणी लेखी अर्जाद्वारे रणजीत सावरकर यांनी केलीय. 'पोलिसांनी कारवाई केली नाही, तर कोर्टात फौजदारी कारवाईसाठी अर्ज करण्यात येईल', असंही सावरकर यांनी स्पष्ट केलंय.
पाच राज्यातल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता काँग्रेस आणि भाजपामधल्या शाब्दिक चकमकींचा धुरळा उडालाय.
छत्तीसगडमधील जगदलपूर मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शेवटची सभा घेतली. या सभेत राहुल गांधींनी 'पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला देशभक्ती शिकवू नये..' असे म्हटले.
आपला हा मुद्दा स्पष्ट करताना राहुल गांधींनी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय.
'काँग्रेसचे नेते इंग्रजांशी लढत असताना सावरकरजी इंग्रजांची हात जोडून प्रार्थना करत होते' असं ते म्हणाले.