#AyodhyaVerdict 'राम मंदिरप्रकरणीचा निकाल श्रेयवादाचा मुद्दा नाही'

काँग्रेसकडून मांडण्यात आली भूमिका....   

Updated: Nov 9, 2019, 01:26 PM IST
#AyodhyaVerdict 'राम मंदिरप्रकरणीचा निकाल श्रेयवादाचा मुद्दा नाही'  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणीचा बऱ्याच वर्षांपासूनचा खटला अखेर शनिवारी निकाली निघाला. राम जन्मभूमीच्या वादग्रस्त जागेवर हिंदूंचा हक्क सांगत ही जागा राम मंदिरासाठीच देण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये आक ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

वादग्रस्त जमीन हिंदूंना देण्यासोबतच मुस्लीम समुदायासाठी पाच एकर स्वतंत्र जमीन देण्याची तरतूदही सर्वोच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयात करण्यात आली. अयोध्येतच ही जमीन देण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलं. साऱ्या देशाचं लक्ष लागेल्या या निर्णयाच्या सुनावणीनंतर राजकीय वर्तुळात त्याचे प़डसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. 

एकीकडे सत्ताधारी भाजप नेत्यांनी या निर्णय़ाचं स्वागत केलं असतानाच दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेत या निर्णयाविषयी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. आस्था आणि विश्वासाचा विचार करत घेण्यात आलेला हा निर्णय समाधानकारक असल्याचं त्यांनी सांगितलं. याचवेळी त्यांनी भाजपचं नाव न घेता एक टोलाही लगावला. 

राम हा सत्तेत्या उपभोगाचं नव्हे, तर सत्याचं प्रतिक आहे; असं म्हणत राम जन्मभूमी मंदिरप्रकरणी घेण्यात आलेला हा निर्णय कोणासाठीही श्रेयवादाचा मुद्दा नसावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. रामाचं नाव हे विभाजनासाठी केलं जात नाही, असं म्हणत या नावाचा वापर करत विभाजनाचा डाव खेळणाऱ्यांना कधी राम समजलच नाही, असंही ते म्हणाले.