मोठी बातमी: केंद्र सरकारकडून राकेश अस्थानांची उचलबांगडी

आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना हे दोन्ही गुजरात केडरचे अधिकारी होते.

Updated: Jan 17, 2019, 09:19 PM IST
मोठी बातमी: केंद्र सरकारकडून राकेश अस्थानांची उचलबांगडी title=

नवी दिल्ली: आलोक वर्मा यांच्यापाठोपाठ केंद्र सरकारने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष संचालक राकेश अस्थाना यांचीही कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदावरून उचलबांगडी केली आहे. केंद्र सरकारने तत्काळ प्रभावाने अस्थाना यांच्यासह चार अधिकाऱ्यांचा सेवाकाळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राकेश अस्थाना यांच्याकडे आता हवाई सुरक्षा विभागाचा कारभार देण्यात येईल. गुजरात केडरच्या आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या सीबीआयमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांतील वादाची देशभरात चांगलीच चर्चा रंगली होती. हा वाद आटोक्याबाहेर गेल्यानंतर सरकारने या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मात्र, आलोक वर्मा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर न्यायालयाने आलोक वर्मा यांच्या फेरनियुक्तीचा आदेश दिला होता. मात्र, या सगळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली उच्चस्तरीय समितीने आलोक वर्मा यांना सीबीआयच्या संचालक पदावरून दूर केले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण सेवा आणि होमगार्ड या सेवांच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, वर्मा यांनी हा पदभार स्वीकारण्यास नकार देत सरकारी सेवेचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे राकेश अस्थाना यांचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येत्या २४ तारखेला सीबीआयच्या नव्या संचालकांची निवड होणार आहे. तत्पूर्वी आज सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले. यामध्ये विशेष संचालक राकेश अस्थाना, संयुक्त संचालक अरूण कुमार शर्मा, उपमहानिरीक्षक मनीष कुमार सिन्हा आणि पोलीस अधिक्षक जयंत जे नाईकनवरे यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला.