राजीव गांधींवरील 'त्या' आरोपात बिलकूल तथ्य नाही; माजी नौदलप्रमुखांची स्पष्टोक्ती

मोदींकडून ज्याप्रकारे दावा केला जात आहे, तशी ही कौटुंबिक सहल नव्हती.

Updated: May 9, 2019, 08:58 PM IST
राजीव गांधींवरील 'त्या' आरोपात बिलकूल तथ्य नाही; माजी नौदलप्रमुखांची स्पष्टोक्ती title=

रायगड: राजीव गांधी यांनी INS विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केला, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप माजी नौदलप्रमुख एल. रामदास यांनी फेटाळून लावला आहे. राजीव गांधी त्यावेळी सहलीसाठी नव्हे तर लक्षद्वीप बेटाच्या विकासासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी गेले होते. त्यामुळेच राजीव गांधी INS विराटवर आले होते, अशी माहिती एल. रामदास यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली. 

त्यावेळी राजीव गांधी लक्षद्वीप बेटांवर आयोजित एका बैठकीला उपस्थित राहणार होते. त्यासाठी त्यांना तिरुअनंतपुरम येथून युद्धनौकेत घेण्यात आले. ते दोन दिवस INS विराटवर होते. यानंतर त्यांना लक्षद्वीप बेटांजवळ उतरवण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नीशिवाय कुटुंबातील अन्य सदस्य नव्हते. तसेच खबरदारी म्हणून त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. मात्र, मोदींकडून ज्याप्रकारे दावा केला जात आहे, तशी ही कौटुंबिक सहल नव्हती. INS विराटचा 'टॅक्सी'सारखा वापर बिलकूल झाला नाही. हा राजीव गांधी यांचा अधिकृत सरकारी दौरा होता, असे एल. रामदास यांनी स्पष्ट केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील प्रचारसभेत राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी भारतीय नौदलातील INS विराटचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या सहलीत सोनिया गांधी यांच्या कुटुंबातील व्यक्तीही होत्या. विदेशी लोकांना देशाच्या युद्धनौकेवर घेऊन जाणे हा देशाच्या सुरक्षेशी खेळ नव्हता का? केवळ राजीव गांधी यांच्या सासूरवाडीची मंडळी होती म्हणून त्यांना वेगळी वागणूक का देण्यात आली?, असा सवाल यावेळी मोदींनी उपस्थित केला होता.