चेन्नई: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांपैकी एक असणारी नलिनी श्रीहरन हिला शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयाकडून ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. मुलीच्या लग्नासाठी सहा महिन्यांची सुट्टी मिळावी, यासाठी एप्रिल महिन्यात नलिनीने अर्ज केला होता. यावेळी नलिनीने स्वत:च न्यायालयासमोर आपली बाजू मांडली होती. यावेळी तिने मुलीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी सुट्टी मिळावी, असे न्यायालयाला सांगितले होते. मात्र, न्यायालयाने नलिनीला केवळ एका महिन्याचीच रजा मंजूर केली आहे.
Rajiv Gandhi Assassination case: Convict Nalini gets 30 day parole from Madras High Court. pic.twitter.com/ZWVo76LxlN
— ANI (@ANI) July 5, 2019
नलिनी ही राजीव गांधी हत्याप्रकरणातील सात दोषींपैकी एक आहे. गेल्या २७ वर्षांपासून ती तुरुंगात आहे. १९९१ साली तामिळनाडूतील प्रचारसभेदरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इल्लमच्या (एलटीटीई) दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती स्फोटात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता.