नवी दिल्ली - अपेक्षेप्रमाणे राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या निकालांमध्ये सत्ताधारी भाजप पिछाडीवर असून काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र दिसते आहे. एक्झिट पोल्सनुसार या राज्यात भाजप सत्तेवरून पायउतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मतमोजणीमध्येही काँग्रेसचे उमेदवारच आघाडीवर असल्याचे दिसते आहे. काही मतदारसंघात भाजपकडूनही त्यांना जोरदार टक्कर दिली जात असल्याचे दिसते.
सर्वसाधारणपणे राजस्थानात पाच वर्षांनंतर कोणताही पक्ष पुन्हा सत्तेवर येत नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला पायउतार करून भाजपने राज्यातील सत्ता हस्तगत केली होती. आणि वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्या होत्या. पण गेल्या पाच वर्षांतील त्याच्या कामकाजावरून जनता फारशी संतुष्ट नसल्याचे दिसते. त्यामुळे मोदी तुझसे बैर नहीं, वसुंधरा तेरी खैर नहीं स्वरुपाच्या घोषणा निवडणुकीच्या प्रचारात देण्यात आल्या होत्या.
काँग्रेसनेही राजस्थानमधील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते प्रचाराच्या काळात राजस्थानात ठाण मांडून होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे सुरुवातीच्या निकालांवरून दिसते.
ताज्या बातम्यांसाठी पाहा LIVE TV