नवी दिल्ली: काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांच्या राजीनामा सत्रानंतर कर्नाटकमधील राजकारणाने नाट्यमय वळण घेतले आहे. या सगळ्या घडामोडींसाठी सोमवारी काँग्रेसने लोकसभेत भाजपला जबाबदार धरले. मात्र, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचा डाव त्यांच्यावरच पलटवला.
कर्नाटकमधील परस्थितीला भाजप जबाबदार नाही. हा राजीनाम्याचा खेळ आम्ही सुरु केला नाही. राहुल गांधी यांनीच सर्वप्रथम राजीनामा दिला. यानंतर काँग्रेसच्या इतर नेत्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली, असा खोचक टोला राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला लगावला. यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकमध्ये रंजक राजकीय घडामोडी सुरु आहेत. सुरुवातीला काँग्रेसच्या १३ आमदारांनी, त्यानंतर एका अपक्ष मंत्र्याने आणि काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. यानंतर सोमवारी जेडीएसच्या सर्व आमदारांनी राजीनामे दिल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसने भाजपवर टीका केली. भाजपला कोणत्याही राज्यात विरोधी पक्षाचे सरकार बघवत नाही. त्यासाठी भाजप अन्य पक्षांच्या सदस्यांना प्रलोभने दाखवून स्वत:कडे खेचत आहे. त्यामुळेच कर्नाटकमधील अनेक आमदारांना चार्टर्ड विमानाने मुंबईत पाठवण्यात आले. याठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची सोय करण्यात आली आहे. भाजप हे सर्व ठरवून करत असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला होता.
मात्र, राजनाथ सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. कुणालाही आमिष दाखवून पक्षांतर करवून घेण्याचा आमचा इतिहास नाही. संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले.