एखाद्या सिरीयलमुळे माझ्या वडिलांची राष्ट्रभक्ती मातीमोल ठरणार नाही- राहुल गांधी

मी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे संकुचित विचारसरणीचा नाही. 

Updated: Jul 14, 2018, 11:13 PM IST
एखाद्या सिरीयलमुळे माझ्या वडिलांची राष्ट्रभक्ती मातीमोल ठरणार नाही- राहुल गांधी title=

नवी दिल्ली: 'सेक्रेड गेम्स' या वेब सिरीजमध्ये भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासंदर्भात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी भाष्य केले. माझे वडील देशासाठीच जगले आणि त्यांनी देशासाठीच बलिदान दिले, हे सत्य आहे. एखाद्या काल्पनिक वेब सिरीजमधील पात्राच्या मतामुळे हे सत्य कधीच बदलणार नाही, असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

यावेळी राहुल गांधी यांनी आपण भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे संकुचित विचारसरणीचे नसल्याचेही सांगितले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवावेसे वाटते. मात्र, मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकांचा घटनादत्त अधिकार असल्याचे मानतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

Netflix ची 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरीज सध्या भरपूर चर्चेत आहे. या मालिकेतील काही दृश्यांमध्ये माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह आशय आहे. हा भाग वगळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या १६ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.