'मोदी' म्हणजे भ्रष्टाचार...', राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर भाजप नेत्याचे जुने ट्विट चर्चेत

Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने देशभरातून मोदी सरकारविरोधात आंदोलन उभं केले आहे. तर दुसरीकडे मी देशवासीयांसाठी लढत असून त्यासाठी मी कुठलीही किंमत चुकवायला तयार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Updated: Mar 25, 2023, 01:01 PM IST
'मोदी' म्हणजे भ्रष्टाचार...', राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर भाजप नेत्याचे जुने ट्विट चर्चेत title=

Rahul Gandhi Disqualified : सूरत हायकोर्टाने मानहानीच्या खटल्यामध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा (Lok Sabha) सचिवालयाने शुक्रवारी अधिसूचना काढून राहुल गांधी यांना अपात्र ठरवले आहे. सूरत हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. या कारवाईनंतर विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र भाजप नेत्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांचे एक ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या कारवाईनंतर ठाकरे गट, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, भारत राष्ट्र समिती आणि आम आदमी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे मी देशवासीयांसाठी लढत असून त्यासाठी मी कुठलीही किंमत चुकवायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी ट्वीट करून दिली होती. राहुल गांधी यांना लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवल्यानंतर भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे एक जुने ट्विट व्हायरल झाले आहे. या  ट्विटवरुन काँग्रेसने आता भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांचे पाच वर्षांपूर्वीचे एक ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या ट्विटच्या माध्यमातून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 2018 मध्ये, खुशबू सुंदर यांनी काँग्रेसमध्ये असताना हे ट्विट केले होते. "यहाँ मोदी वहान मोदी जहाँ देखो मोदी... पण हे काय? प्रत्येक मोदींच्या समोर भ्रष्टाचाराचे नाव असते... चला मोदी नावाचा अर्थ भ्रष्टाचार करुया #Nirav #Lalit #Namo = Corruption..," असे खुशबू सुंदर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. हे ट्विट अद्यापही खुशबू सुंदर यांच्या अकाऊंटवर आहे.

Khushbu Sundar tweet

 

दरम्यान, हे ट्वीट व्हायरल होताच काँग्रेस नेत्यांनी त्याचे स्क्रीनशॉर्ट काढून व्हायरल करत भाजपला सवाल केला आहे. काँग्रेस नेत्यांनी ट्विटरवर खुशबू सुंदर यांच्यावर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल केला आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही खुशबू सुंदर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार का असा प्रश्न ट्वीट करत विचारला आहे. खुशबू सुंदर आता भाजपच्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सक्रिय सदस्य आहेत.