आरक्षण कधी रद्द होणार? राहुल गांधींचा सेल्फ गोल? विरोधकांनी घेरलं

अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या काँग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी एक मोठं विधान केलंय. अमेरिकेत केलेल्या राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे देशभरात राजकीय पडसाद उमटत आहेत. नेमकं  काय बोललेत राहुल गांधी जाणून घेऊया.

वनिता कांबळे | Updated: Sep 11, 2024, 08:47 PM IST
आरक्षण कधी रद्द होणार? राहुल गांधींचा सेल्फ गोल? विरोधकांनी घेरलं title=

Rahul Gandhi's Comments on Reservation Spark Political Showdown : संविधानाच्या मुद्द्यावरुन भाजपची कोंडी करणारे राहुल गांधीच आपल्या एका विधानावरुन सत्ताधा-यांच्या कचाट्यात सापडले आहेत.. मोदी सरकार आणि संघावर टीका करत असताना राहुल गांधींनी भारतातल्या आरक्षणावर वादग्रस्त विधान केलंय..  

जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीनं समानता असेल तेव्हा  काँग्रेस पक्ष देशातील आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल. सध्यातरी अशी परिस्थिती नाही असं विधान राहुल गांधींनी केलं.. आणि सताधा-यांना ते आयतेच सापडले..  काँगेसची सुरूवातीपासूनच आरक्षणविरोधी राजकीय विचारसरणी आहे. राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला आहे,अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. 

आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू ,अस म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधींच्या आरक्षणाच्या विधानावरुन आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही निशाणा साधलाय.
 राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विधान करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशाच्या समोर आणण्याचं काम केलं आहे. जोपर्यंत भाजपा आहे, तोपर्यंत आरक्षणाला कुणी हातही लावू शकत नाही. भाजपा आहे तोपर्यंत देशाच्या एकात्मतेशी कुणीही खेळू शकत नाही असा इशारा अमित शाहांनी पोस्ट करत दिलाय..

काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत आरक्षण बचाव,संविधान बचावचा नारा दिला. लोकांनीही काँग्रेसला समर्थन केलं. मात्र राहुल गांधींच्या विधानानंतर काँग्रेसला आता डॅमेज कंट्रोल करावं लागतंय..  काँग्रेसला आरक्षण संपुष्टात आणायंचं नसून आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्यावर न्यायची आहे,अशी सारवासारव काँग्रेसनं केलीय... मात्र सत्ताधा-यांना काँग्रेसला तसंच राहुल गांधींना घेरण्याची आयतीच संधी मिळालीय.