नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नतृत्वाखाली स्थापन झालेल्या केंद्रातील भाजप सरकारला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच या सरकारच्या हातात आता केवळ एकच वर्ष उरले आहे. त्यामुळे या चार वर्षांतील भाजप सरकार तसेच, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरी आणि लोकप्रियतेचाही आढावा घेतला जात आहे. हा आढावा घेण्यासाठी विविध संस्था लोकांमध्ये जाऊन सर्व्हे करत आहेत. या सर्व्हेतील आकडेवारी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रीयतेत कमालीची घसरण होताना दिसत आहे. तर, दुसऱ्या बाजुला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेचा आलेख मात्र वाढताना दिसतो आहे. राहुल गांधी यांची लोकप्रियता इतकी वाढत आहे की, ती पंतप्रधान मोदींनाही तोडीस तोड असून, भविष्यात मोदींना पर्याय ठरू शकते अशीही चिन्हे आहेत.
एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरित्या केलेल्या एका सर्व्हेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालातील आकडेवारी पाहता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील लोकप्रियतेतील तफावत वेगाने कमी होत आहे. यात लोकांमध्ये भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत नाराजी (अँटी इन्कम्बन्सी) वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये नजीकच्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या निवडणुकाही भाजपला म्हणाव्या तितक्या सोप्या जाणार नाहीत, असे भाकीत या अहवालात करण्यात आले आहे.
दरम्यान, साधारण १९ राज्यांमधील सुमारे १५ हजारांहून अधिक लोकांची मते या सर्व्हेदरम्यान जाणून घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील हा सर्व्हे २० एप्रिल ते १७ मे २०१८ या काळात करण्यात आला. या सर्व्हेचे दोन टप्पे या आधीच पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल उत्तर प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक निकालानंतर प्रसिद्ध करण्यात आले होते. सर्व्हचा कल पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि भाजपप्रणित एनडीए यांच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी प्रचंड वाढत आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.
सर्व्हेतील आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना ४३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर, राहुल गांधींनाही जवळपास तितक्याच लोकांनी पसंती दर्शवली आहे. राहुल गांधीना होणाऱ्या विरोधाची धार कमी होत असून, त्यांना स्विकारणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर, त्याउलट मोदींना स्विकारणाऱ्यांची संख्या घटत असून त्यांना होणऱ्या विरोधकांची संख्या वाढत आहे. २५ टक्के लोकांना मोदी पूर्वी आवडत नव्हते पण, आता ते त्यांना आवडू लागलेत. तर, दुसऱ्या बाजूला राहुल गांधी सुरूवातील आवडत नव्हते, पण आता आवडत आहेत असे म्हणणारांची आकडेवारी २९ टक्के इतकी आहे.
सर्व्हेत राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचेही भाकीत वर्तविण्यात आले आहे. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस आणि भजपला अनुक्रमे १५ व ५ टक्के असे मतदान होईल असे म्हटले आहे. याचाच अर्थ असा की, राजस्थान आणि मध्य प्रदेशात सत्तांतर होऊन भाजप सत्तेतून बाहेर जाईल आणि काँग्रेस सत्तेत येईल.