नवी दिल्ली : राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसनं पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. १६ डिसेंबरला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
४ डिसेंबरला राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा अर्ज भरला होता. त्यावेळी राहुल गांधींबरोबर दुसऱ्या कोणत्याही काँग्रेस नेत्यानं अध्यक्षपदाचा अर्ज भरला नव्हता. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जमागे घेण्याचा आज ११ डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे राहुल गांधींची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं.
अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हे एकमेव उमेदवार असून, त्यांच्या वतीने दाखल केलेले सर्व ८९ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेत. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन आणि सदस्य मधुसूदन मिस्त्री तसेच भुवनेश्वर कलिता राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
रामचंद्रन यांनी सांगितले की, निवडीची घोषणा झाली असली तरी अध्यक्षपदी नेमणुकीचे अधिकृत प्रमाणपत्र राहुल गांधी यांना १६ डिसेंबर रोजी मावळत्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिलं जाईल. त्या दिवशी सकाळी ११ वाजता १३२ वर्षांच्या जुन्या पक्षाची धुरा अध्यक्ष या नात्याने स्वीकारल्यानंतर राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात देशभरातून आलेल्या पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेतील.