'जेटलींनी सांगावं, त्यांनी माल्ल्याला पळवलं की तसा आदेश मिळाला होता'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय

Updated: Sep 13, 2018, 03:46 PM IST
'जेटलींनी सांगावं, त्यांनी माल्ल्याला पळवलं की तसा आदेश मिळाला होता' title=

नवी दिल्ली : दारु व्यावसायिक विजय माल्ल्यानं आपण भारत भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतल्याचं सांगितलं आणि भारतीय राजकारणात एकच भूकंप झाला. माल्ल्याच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. बुधवारी ट्विटद्वारे जेटलींचा राजीनामा मागितल्यानंतर गुरुवारी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. 'जेटली फार मोठी मोठी भाषणं ठोकतात पण त्यांनी अगोदर हे सांगावं की विजय माल्याला त्यांनी स्वत: पळून जायला मदत केली की त्यांनी कुणाचा आदेश मिळाला होता?' असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलंय. 

राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत दोन प्रश्न विचारले. पहिला म्हणजे, जेव्हा माल्ल्या अर्थमंत्री जेटलींना सांगतो की तो लंडनला जाणार आहे तेव्हा ते याची माहिती सीबीआय आणि ईडीला का देत नाहीत? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, माल्ल्याची अरेस्ट नोटीस इन्फॉर्म नोटीसमध्ये का बदलली गेली? या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधींनी भाजप सरकारकडे मागितलीत. 

या पत्रकार परिषदेत राहुल गांधींसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते पीएल पुनिया, अशोक गहलोत, रणदीप सुरजेवाला हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यायला हवेत... आणि जेव्हापर्यंत याची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत जेटलींनी पदावरून पायउतार व्हावं, अशीदेखील मागणी राहुल गांधींनी केली.