Job Working Hours : पुण्यातील 26 वर्षीय सीएच्या निधनामुळं कथित स्वरुपात कामाचा वाढता ताण आणि सध्याच्या पिढीपुढे असणारी आव्हानं आणि नोकरदार आस्थापनांकडून महत्त्वाच्या समस्यांबाबत केली जाणारी डोळेझाक हे मुद्दे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. मन विचलित करणाऱ्या या बातमीनं नोकरीच्या ठिकाणी असणारं दडपणाचं वातावरण आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा न संपणारा भार या अनेक समस्यांना यादरम्यान वाचा फुटली आणि नेमकी ही संस्कृती चाललीय कोणत्या दिशेला याचसंदर्भात प्रश्न उभे राहिले.
जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननं दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये दीर्घकाळ काम केल्यामुळं स्ट्रोक आणि गंभीर हृदयरोगामुळं 745000 जणांचा मृत्यू ओढावला. 2000 या वर्षाच्या तुलनेत हा आकडा 29 टक्क्यांनी वाढला होता. निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार 35 ते 40 तास काम करण्याच्या तुलनेत दर आठवड्याला 55 किंवा त्याहून अधिक तास काम केल्यास स्ट्रोक अर्थात पक्षाघाताचा धोका 35 टक्क्यांनी तर, गंभीर हृदयरोगांचा धोका 17 टक्क्यांनी वाढतो.
नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अपेक्षेहून अधिक तासांसाठी कामावर रुजू ठेवण्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. जिथं कर्मचारी सरासरी जास्त वेळ काम करतात. आयएलओच्या माहितीनुसार भारतात कर्मचारी एका आठवड्याला 46.7 टक्के इतकं सरासरी काम करतात. भारताशिवाय या यादीत भूतान, बांगलादेश, मॉरिटानिया, काँगो, बुर्किना फासो, पाकिस्तान, युएई, लेबनान, म्यानमार, या देशांमधील कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी तासन् तास काम करतात. एकट्या भारताचच म्हणावं तर, देशातील जवळपास अर्धी लोकसंख्या एका आठवड्यात सरासरी साधारण 49 टक्के काम करते आणि हाच सध्या वादाचा मुद्दा ठरत आहे.