मुंबई: काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताचा कट आखला गेला होता. त्याची सगळी तयारीही झाली होती. मात्र सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे, पुलवामा 2 घडवण्याचा कट यशस्वीपणे हाणून पाडण्यात आला.
भारतात अशांत स्थिती कशी राहिल यासाठी पाकिस्तानकडून सतत प्रयत्न केले जात असतात. त्याचाच नवा भाग पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेनं रचला होता. 'अल बदर' या दहशतवादी संघटनेनं हा घातपाताचा कट रचला होता.
जम्मू बस स्टँडवर ठेवलेली 7 किलो स्फोटकं सुरक्षा दलांनी जप्त केली. दशतवादी सुहैल चंदिगढला मेडिकलचं शिक्षण घेत होता. या प्रकरणी सुहैल आणि साथीदाराला चंदिगढमधून अटक करण्यात आली आहे.
रघुनाथ मंदिर, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि जम्मू सराफा बाजार, तसंच, लखदत्ता बाजारमध्ये घातपात घडवण्याचं सुहैल चंदिगढचं षडयंत्र होतं अशी माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्याला 14 फेब्रुवारीला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच, नेमक्या त्याचवेळी मोठ्या हल्ल्याचा कट सुरक्षा दलानं उधळून लावला. दरम्यान इंटरपोलनं पुलवामा हल्ल्य़ाला जबाबदार जैश ए मोहम्मदच्या मौलाना मसूद अझरसह चार दहशतवाद्यांविरोधात नोटीस जारी केली आहे.