Pulwama Attacked : फुटीरतावादी नेता यासीन मलिकला अटक

जेकेएलएफ प्रमुख यासीन मलिक याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

Updated: Feb 23, 2019, 07:40 AM IST
Pulwama Attacked : फुटीरतावादी नेता यासीन मलिकला अटक  title=

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिर सरकारतर्फे फुटीरतावादी नेत्यांवर व्यापक कारवाईचे संकेत दिले. त्यांना दिली जाणारी सुरक्षा काढून घेण्यात आली. दरम्यान जेकेएलएफ प्रमुख यासीन मलिक याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आणि लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अजून कोणत्या फुटीरतावादी नेत्याला अटक करण्यात आली ? याबद्दलचा तपशील समोर आला नाही. पुलवामात लष्करी ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 8 दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. दरम्यान याआधी जम्मू- काश्मीरमधील १८ फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा प्रशासनाकडून हटवण्यात आली होती. याशिवाय पीडीपीचे नेते वाहिद पारा आणि आयएएस ऑफिसर शाह फैजल यांच्यासह इतर १५५ नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी मीरनवाज उमर फारुख, अब्दुल गानी भट, बिलाल लोन, हाशिम कुरेशी आणि शबीर शाह यांची सुरक्षा प्रशासनाकडून परत घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही कारवाई करण्यात आली आहे.

हास्यास्पद बातमी 

याआधीच काश्मिर सरकारने फुटीरतावादी नेत्यांना पुरवली जाणारी सुरक्षा मागे घेतली. यासिन मलिकने या सर्वाला खोटेपण असल्याचे म्हटले होते. मला राज्यातून कधीच कोणती सुरक्षा दिली गेली नसल्याचे यासिन म्हणाला. कट्टरतावादी हुर्रियत कॉन्फरन्समध्या त्यांचे अध्यक्ष सैयद अली शाह गिलानी यांनी सुरक्षा काढून घेतल्याचा प्रकार हास्यास्पद असल्याचे म्हटले होते. माझ्याकडे गेले 30 वर्षे कोणीही सुरक्षा नसल्याचे मलिकने म्हटले. जर सुरक्षा मिळालीच नाही तर कशी परत करणार असा प्रश्न त्यांना माध्यमांसमोर विचारला होता. सरकार बेईमानी करत असल्याचे ते म्हणाले. सैय्यद अली शाह गिलानीची सुरक्षा परत घेण्याची संबधित अधिसूचना खोटी असल्याचे मलिकने म्हटले. ही बातमी एकदम खोटी असून अशा हास्यास्पद बातम्यांवर हसू येत असल्याचे कट्टरतावादी कॉन्फरन्सच्या प्रवक्तांनी म्हटले. 

घरांवर छापे 

काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या आर्थिक निधीचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी नेत्यांसह अन्य काही ठिकाणी रविवारी पुन्हा छापे घातले. यामध्ये पाकिस्तानी चलनासह अन्य परदेशी चलन हस्तगत करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या अधिका-यांनी दिली. या छाप्यांमध्ये काही हजार पाकिस्तानी रुपये तसेच संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचे चलन तसेच काही कागदपत्रे आढळली. ही सर्व कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्यांनी दिली.यात सय्यद अली शाह गिलानी याच्या नेतृत्वाखालील तेहरीक-ए- हुर्रियतचा प्रवक्ता अयाझ अकबर याच्या घरी छापे घालण्यात आले.