दहशतवादावर कायमस्वरुपी तोडगा काढा, पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धूची प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये अवंतीपोराजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळला.

Updated: Feb 15, 2019, 01:40 PM IST
दहशतवादावर कायमस्वरुपी तोडगा काढा, पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धूची प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये अवंतीपोराजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळला. अनेकांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंजाबमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. पण अशा स्वरुपाच्या हल्ल्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे, अशी प्रतिक्रिया नवज्योतसिंग सिद्धू याने व्यक्त केली.

अशा पद्धतीने किती दिवस आमचे जवान शहीद होणार आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला सोबत घेतले पाहिजे, अशी प्रतिक्रिया नवज्योतसिंग सिद्धू याने 'एएनआय'शी बोलताना व्यक्त केली.  

अवंतीपोराजवळ गुरुवारी संध्याकाळी करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. जवानांचा मोठा ताफा काश्मीरच्या दिशेने निघाला असताना आयईडी स्फोटकांच्या साह्याने हा हल्ला घडवून आणण्यात आला. त्यामध्ये सीआरपीएफच्या जवानांना घेऊन निघालेल्या बसचे अनेक तुकडे झाले आहेत. या बसमधील सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत.

दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा देशातील सर्व नागरिकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा निषेध करताना दहशतवाद्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना आता याची शिक्षा भोगावीच लागेल, असे सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या हल्ल्याचा निषेध करताना आम्ही सर्व केंद्र सरकारसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. कट्टरवाद्यांना देशात फूट पाडू देण्याचे काम आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. सर्व देशवासिय एकजूट आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.