पंतप्रधानपदासाठी जनतेची मोदींनाच पसंती; केवळ 'या' राज्यांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा

या सर्वेक्षणातून आणखी एक महत्त्वपूर्ण बाब पुढे आली आहे. 

Updated: Nov 3, 2018, 01:15 PM IST
पंतप्रधानपदासाठी जनतेची मोदींनाच पसंती; केवळ 'या' राज्यांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा title=

नवी दिल्ली: आगामी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच राहुल गांधींपेक्षा योग्य दावेदार असल्याचा कौल देशातील जनतेने दिला आहे. केवळ दक्षिणेतील राज्ये याला अपवाद ठरली आहेत. इंडिया टुडे-एक्सिस- माय इंडिया यांनी केलेल्या पॉलिटिकल स्टॉक एक्स्चेंज सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला. फोनवरून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ५४० लोकसभा मतदारसंघातील लोकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये ४६ टक्के लोकांनी पंतप्रधानपदाचा पुढील दावेदार म्हणून मोदींना पसंती दिली. तर ३२ टक्के जनतेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या पारड्यात मतदान टाकले. उर्वरित २२ टक्के लोकांनी 'माहिती नाही' हा पर्याय निवडला. 

या सर्वेक्षणानुसार उत्तर भारत, पूर्व भारत आणि पश्चिम भारतात मोदी राहुल गांधींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. तर दक्षिणेकडील राज्यातील लोकांनी पंतप्रधान पदासाठी मोदींपेक्षा राहुल गांधींच्या नावाला अधिक पसंती दिली आहे. 

उत्तर भारतातील ४५ टक्के लोकांनी मोदी तर २७ टक्के जनतेने राहुल गांधी पंतप्रधानपदाचे आगामी दावेदार असल्याचे सांगितले. पूर्वेकडील राज्यांमध्ये ५० टक्के लोकांनी मोदी तर २५ टक्के लोकांनी राहुल यांच्या पारड्यात मत टाकले. तर पश्चिम भारतामध्ये ५२ टक्के जनतेला मोदी तर ३३ टक्के जनतेला राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य दावेदार असल्याचे वाटते. 

केवळ दक्षिणेकडील राज्यांनी उर्वरित भारतापेक्षा वेगळे मत नोंदवले आहे. येथील ४० टक्के जनतेने आश्चर्यकारकरित्या पंतप्रधान म्हणून राहुल यांना पाठिंबा दिला. याठिकाणी मोदींना राहुल यांच्यापेक्षा तीन टक्के कमी मते मिळाली आहेत. 

या सर्वेक्षणातून आणखी एक महत्त्वपूर्ण बाब पुढे आली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मोदी राहुल यांच्यापेक्षा पुढे असले तरी २०१४ च्या तुलनेत त्यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय घसरण झाली आहे. २०१४ मध्ये मोदींच्या लोकप्रियतेची टक्केवारी ही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्या एकत्रित लोकप्रियतेच्या दुप्पट होती. 

भविष्यात हाच ट्रेंड कायम राहिल्यास काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळू शकते. मात्र, लोकसभेची लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी व्हावी, यासाठी भाजप जाणीवपूर्वक प्रयत्न करेल, असा निवडणूक विश्लेषकांचा अंदाज आहे.