डॉ.प्रकाश आमटेंना बिल गेट्स यांच्या हस्ते 'लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्कार

अतिदुर्गम हेमलकसात डॉ.प्रकाश आमटे यांचे १९७३ पासून लोकबिरादरी प्रकल्पात कार्य 

Updated: Nov 18, 2019, 07:39 AM IST
डॉ.प्रकाश आमटेंना बिल गेट्स यांच्या हस्ते 'लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्कार  title=

नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी बातमी... पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आलं. रविवारी 17 नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा दिल्लीतील आयसीएमआर हॉलमध्ये पार पडला. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आलं. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यासह हा पुरस्कार डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ  बिल गेट्स यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे डॉ.प्रकाश आमटे यांनी १९७३ मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. तेव्हापासून भौतिक सुविधांचा प्रचंड अभाव असतानाही डॉ.प्रकाश आमटे व डॉ.सौ.मंदाकिनी आमटे यांनी अशिक्षित व गरीब आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवून त्यांना शिक्षणाची संधीही उपलब्ध करुन दिली. लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून त्यासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य  समर्पित केले आहे.

यापूर्वी डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानै ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवीने गौरवान्वित केले होते. २००९ मध्ये डॉ.प्रकाश आमटे यांना रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  डॉ.प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव होणं, ही बाब पुन्हा महाराष्ट्रासाठी भूषणावह ठरली आहे.