मोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..'

Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: राजस्थानमधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा समाचार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी बंगळुरुमधील जाहीर भाषणात घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या आईचा आणि आजीचा उल्लेख केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 24, 2024, 12:28 PM IST
मोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..' title=
जाहीर सभेत प्रियंका गांधींचं विधान

Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. घुसखोरांना संपत्ती देण्यासाठी काँग्रेसने भारतातील लोकांना लुटल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर प्रियंका गांधींनी मागील 50 वर्ष काँग्रेसने देशावर राज्य केलं तेव्हा असं कधी घडलं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधानांनी महिलांची मंगळसूत्रं आणि सोनं लुटण्याचा काँग्रेसचा कट असल्याची टीका केल्याचा संदर्भ देत प्रियंका गांधींनी त्यांच्या आजीने म्हणजेच इंदिरा गांधींनी युद्धाच्या वेळी देशासाठी आपलं सोनं देऊन टाकल्याचा उल्लेख केला. तर आपल्या आईने तिचं मंगळसूत्र देशासाठी त्यागलं असंही प्रियंका यांनी म्हटलं. 

माझ्या आजीचे देशासाठी सोनं दिलं तर आईने...

बंगळुरुमध्ये जाहीर भाषणामध्ये प्रियंका गांधींनी मागील काही दिवसांपासून टीव्ही लावल्यावर काय ऐकू येतं यासंदर्भातील भाष्य करताना लोकांच्या विकासाचं काही ऐकायला मिळत नाही. तर केवळ 'वायफळ वक्तव्य' आणि मागण्या ऐकायला मिळतात, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. "ते (पंतप्रधान) म्हणतात काँग्रेसला तुमचं सोनं आणि मंगळसूत्रं न्यायाची आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली. त्यापैकी 55 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. या काळात कधी कोणी तुमचं सोनं किंवा मंगळसूत्र चोरलं का? ज्यावेळेस युद्ध सुरु होतं तेव्हा इंदिरा गांधींनी देशासाठी आपलं सोनं दान केलं. माझ्या आईने देशासाठी तिच्या मंगळसुत्राचं बलिदान दिलं आहे," असं प्रियंका गांधी म्हणाल्या. 

कधी ते अपमानाबद्दल बोलतात तर कधी धर्माबद्दल

"पंतप्रधान म्हणतात की ते 400 हून अधिक जागा मिळवतील आणि संविधान बदलतील. कधी ते म्हणतात की त्यांचा अपमान केला जातो. कधीतरी ते धर्मासंदर्भात बोलतात. तुम्ही जगातील सर्वात सुशिक्षित शहरांपैकी एकामध्ये राहता... तुम्ही या सर्वासाठी पात्र आहात का?" असा सवाल प्रियंका गांधींनी बंगळुरुवासियांना विचारला. 

नक्की वाचा >> राज्यात 8 वर्षांपूर्वीच येणार होतं BJP-NCP सरकार, पण पवारांनी..; तटकरेंचं 'ओपन चॅलेंज'

मोदी नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधान मोदींनी भारतीयांची संपत्ती घुसखोरांमध्ये वाटप करण्याचा काँग्रेसचा कट असल्याचं विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वादा अगदी निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. राजस्थानमधील जाहीर सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील संदर्भ देत टिका केली. 'प्रत्येकाच्या संपत्तीचं सर्वेक्षण केलं जाईल. प्रत्येक माता-भगिनीकडे असलेल्या सोन्याची मोजणी होईल आणि त्याचं वाटप केलं जाईल. ते तुमची मंगळसूत्रंही सोडणार नाहीत,' असं पंतप्रधान मोदी भाषणात म्हणाले होते. 

नक्की वाचा >> भारतातही अमेरिकेप्रमाणे 'वारसा कर' लावणार? 55% संपत्ती सरकारी तिजोरीत जाणार? नवा वाद

मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व ठाऊक असतं तर...

"पंतप्रधान मोदींनी मंगळसूत्राचं महत्त्व ठाऊक असतं तर त्यांनी अशापद्धतीचं विधान केलं नसतं. जेव्हा नोटबंदी झाले तेव्हा त्यांच्यामुळे महिलांना त्यांनी बचत केलेले पैसे वापरावे लागले. शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान 600 शेतकऱ्यांनी प्राण गमावले. त्या विधवा महिलांच्या मंगळसूत्रांचा मोदीजींनी कधी विचार केला आहे का?" असा सवाल प्रियंका गांधींनी उपस्थित केला.