मुंबई : भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आणीबाणीमुळे टीका होत असली तर अनेक कठोर निर्णय घेण्यात काँग्रेस नेत्यांसोबतच विरोधकांना देखील कसं आपल्या सोबत घ्यायचं ही कला त्यांच्यामध्ये होती. देशाच्या माजी पंतप्रधान अलट बिहारी वाजपेयी यांनी देखील विरोधी पक्षात असताना एका भाषणात इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हटलं होतं. आज प्रियंका गांधीमध्ये अनेकांना इंदिरा गांधी दिसतात. अनेकांना असं वाटतं की, प्रियंका गांधी यांच्याकडे देखील इंदिरा गांधी यांच्यासारखे गुण आहेत. प्रियंका गांधी यांची हेयरस्टाईल, कपड्यांचं सिलेक्शन आणि बोलण्याची पद्धत या इंदिरा गांधी यांच्या सारख्यास आहेत. प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं म्हणून अनेकदा काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील आवाज उठवला होता. पण आज प्रियंका गांधी यांचा राजकारणात सक्रिय प्रवेश झाला आहे. ज्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर असतानाच प्रियंका गांधी यांचा राजकारणात एन्ट्री झाली आहे. आता प्रियंका गांधी पडद्याच्या मागे नसणार आहेत. त्या आता काँग्रेससाठी रणनीती तयार करताना दिसतील. याआधी प्रियंका गांधी या फक्त आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या मतदारसंघातच प्रचार करताना दिसत होत्या. पण आता त्यांची जबाबदारी वाढल्याने त्यांचं काम देखील वाढणार आहे. काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये प्रियंका गांधी यांचा सल्ला देखील घेतला जात होता. पण आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना पक्षाच्या महासचिवपदाची जबाबदारी दिली आहे. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
काँग्रेससाठी आज आनंदाची बातमी आली जेव्हा प्रियंका गांधी यांच्या सक्रीय प्रवेशाची घोषणा झाली. प्रियंका यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. याची तुलना देखील त्यांची आजी इंदिरा गांधीसोबत केली जाते. कार्यकर्त्यांसोबत संवाद करण्याचं कौशल्या इंदिरांप्रमाणे प्रियंका यांच्याकडे देखील आहे. नाराज नेत्यांना आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात इंदिरांप्रमाणे प्रियंका गांधी या देखील हुशार आहेत. प्रियंका गांधी या युवा वर्गात देखील लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव निश्चितच काँग्रेससाठी फायदेशीर ठरु शकतो.
प्रियंका यांचा लुक आणि स्टाईल यामुळे त्यांच्यामध्ये अनेकांना इंदिरा गांधी याचं दिसतात. इंदिरा गांधी यांची कठोर निर्णय घेणाऱ्या नेत्या म्हणून ओळख होती. काँग्रेसला सध्या नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधी यांना पक्षाचा चेहरा करण्याचा प्रयत्न होत असला तरी प्रियंका गांधी यांना देखील अनेकांचा पाठिंबा आहे. प्रियंका गांधी यांच्या पक्षात सक्रीय सहभागाने पक्षात मोठा बदल होईल असं देखील अनेकांना वाटतं. इंदिरा गांधी यांची भाषण करण्याची कला देखील इंदिरा गांधी यांच्या सारखीच आहे. लोकांसोबत बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य़ असतं. इंदिरा यांच्याप्रमाणेच प्रियंका यांच्याकडे देखील राजकारणाची योग्य समज असल्य़ाचं बोललं जातं. प्रियंका या कधीच वादात सापडल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस २०१९ लोकसभा निवडणुकीत याचा पूर्णपणे फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करेल.