नवी दिल्ली: निवडणूक आयोगाच्या शिफारसीनंतर मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडूच्या वेल्लोर मतदारसंघातील मतदान रद्द करण्याचे आदेश दिले. वेल्लोरमध्ये १८ एप्रिलला मतदान होणार होते. मात्र, या मतदारसंघातील निवडणुकीत पैशांचा मोठ्याप्रमाणावर गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे येथील मतदान प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस केली होती.
याठिकाणी मतदारांना भुलवण्यासाठी पैशांचा मोठ्याप्रमाणावर वापर होत असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली होती. निवडणूक आयोगाने कारवाई करत द्रमुकचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे खजिनदार एस. दुरईमुरुगन यांचा मुलगा कथिर आनंद याच्या घरावर छापा टाकून मोठी रोकड जप्त केली होती. यानंतर निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा दुराईमुर्गन यांच्या मालकीच्या महाविद्यालयातून मोठी रोकड हलवण्यात येत असल्याचे समजले होते. तेव्हादेखील निवडणूक आयोगाने छापा टाकून ११.५३ कोटींची रोकड जप्त केली होती.
Election Commission: Accepting the recommendation of EC dated 14th April 2019, President has rescinded the election to Vellore parliamentary constituency, Tamil Nadu. pic.twitter.com/iyqw9uTkcV
— ANI (@ANI) April 16, 2019
यानंतर पोलिसांनी कथिर आनंद आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. देशभरात रोकड, अंमली पदार्थ, दारु, मौल्यवान धातू आणि मोफत वाटण्यासाठी आणलेल्या वस्तू अशा एकूण मुद्देमालाची किंमत तब्बल २,५५० कोटींच्या घरात जाते. यापैकी ४९९ कोटींची मुद्देमाल हा तामिळनाडूमधून जप्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १४ एप्रिल २०१९ रोजी राष्ट्रपतींकडे वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. राष्ट्रपतींनी ही विनंती मान्य करत आयोगाला निवडणूक रद्द करण्यास परवानगी दिली असल्याचे निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले. दरम्यान, या निर्णयावर द्रमुकचे कोषाध्यक्ष एस. दुरईमुरुगन यांनी टीका केली असून ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे.