लोकसभा निवडणुकीतील 'हा' विजयी उमेदवार देणार राजीनामा

मी हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नाही.

Updated: May 24, 2019, 06:31 PM IST
लोकसभा निवडणुकीतील 'हा' विजयी उमेदवार देणार राजीनामा title=

बंगळुरू: लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधून निवडून आलेले सेक्युलय जनता दलाचे एकमेव विजयी उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा हे आपल्या आजोबांसाठी पदाचा राजीनामा देणार आहेत. प्रज्ज्वल हे जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. कर्नाटकच्या हसन मतदारसंघातून ते विजयी झाले होते. 

राजकारणात पदार्पण करणाऱ्या आपल्या नातवासाठी देवेगौडा यांनी हसन हा स्वत:चा पारंपरिक मतदारसंघ सोडला होता. त्याऐवजी ते शेजारच्या तुमकुरू या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. मात्र, भाजपच्या झंझावातापुढे त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे देवेगौडा यांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न भंगले होते. 

मात्र, आता प्रज्ज्वल रेवण्णा यांनी पुढाकार घेत आपल्या आजोबांना पुन्हा हसन मतदारसंघातून निवडून आणण्याचे ठरवले आहे. देवेगौडा यांच्या पराभवामुळे सेक्युलय जनता दलाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खालावले आहे. ते परत आणण्यासाठी मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. जेणेकरून देवेगौडा पुन्हा एकदा निवडून येतील, असे प्रज्ज्वलने सांगितले. प्रज्ज्वल रेवण्णा हे कर्नाटकच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच.डी. रेवण्णा यांचे पूत्र आहेत. 

प्रज्ज्वल यांनी हा निर्णय घेतला असला तरी देवेगौडा यांनी अजून त्याला संमती दिलेली नाही. मात्र, मी हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नाही. देवेगौडा यांचे लोकसभेत असणे खूपच महत्त्वाचे आहे. आपण लवकरच देवेगौडा यांची भेट घेऊन त्यांना याबद्दल सांगू. मी अजून खूप तरुण असून माझ्याकडे राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी बराच अवधी आहे. आतापर्यंत देवेगौडा यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा कर्नाटकला खूपच फायदा झाला. त्यामुळे आतादेखील लोकसभेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी देवेगौडा संसदेत असणे गरजेचे आहे, असे प्रज्ज्वल यांनी सांगितले. 

कर्नाटकमधील एकूण २८ जागांपैकी २३ जागांवर भाजपने विजय मिळवला. तर जनता दलाला दोन आणि काँग्रेसला तीन जागांवरच विजय मिळवता आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचे पूत्र निखिल कुमारस्वामी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.