नवी दिल्ली : प्रधानमंत्री श्रम योगी योजना (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana)आजपासून लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत असंगठीत क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना वयाच्या 60 वर्षानंतर तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाणार आहे. 1 फेब्रुवारीच्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने याची घोषणा केली होती. आता सरकारने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या योजनेशी जोडू इच्छिणाऱ्या कामगाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त असू नये. केंद्र सरकारच्या याआधीच्या पेंशन योजनांचा लाभ घेणाऱ्या सदस्य असणाऱ्या वर्कर मानधन योजनेसाठी पात्र ठरवले जाणार नाही. रिक्षा चालक, निर्माण कार्य करणारे मजदूर, कचरा वेचक, बीडी बनवणारे,कृषी कामगार, मोची, धोबी, चांभार अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांना याचा लाभ होणार आहे.
मेगा पेंशन योजनेशी जोडल्या गेलेल्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे वेतन 15 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. पात्र व्यक्तीकडे स्वत:चा सेव्हींग अकाऊंट आणि आधार नंबर असायला हवा.
योजनेशी जोडल्या गेलेल्या 18 वर्षाच्या कामगाराने 55 रुपयांचे मासिक शुल्क जमा करणे गरजेचे आहे. इतकीच रक्कम सरकार देखील भरणार आहे. जास्त वयाच्या व्यक्तींचा मासिक हफ्ता देखील वाढणार आहे. 29 व्या वर्षी योजनेशी जोडल्या गेलेल्या कामगारांना 100 रुपये मासिक हफ्ता द्यावा लागणार आहे. तर 40 वर्षे वर्षाच्या व्यक्तीला 200 रुपये प्रति महिना हफ्ता द्यावा लागणार आहे. 60 वर्षे होईपर्यंत ही रक्कम भरावी लागणार आहे.
कोणताही कामगार नियमित हफ्ता भरत असेल आणि कोणत्या तरी कारणाने त्याचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी किंवा पती ही योजना पुढे चालवू शकतात. कामगाराच्या मृत्यूनंतर जर संबंधितांना योजना बंद करायची असेल तर तेव्हापर्यंत भरलेली पूर्ण रक्कम व्याजासहित मिळणार आहे.
योजनेचे लाभार्थी काही कारणाने विकलांग झाल्यासही योजना पुढे सुरू ठेवू शकतात किंवा त्यातून बाहेर पडू शकतात. पेंशन सुरू असताना लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास तिचा पती किंवा पत्नी पेशंनचा हकदार असेल. त्यांना पेंशनच्या रक्कमेतील 50 टक्के रक्कम दिली जाणार असल्याचे अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.