कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी वक्तशीरपणा, शिस्त पाळणं अपेक्षित असतं. कर्मचारी वेळेत यावेत तसंच त्यांनी कामाचे सगळे तास भरावेत यासाठी कंपन्या आग्रही असतात. यासाठी तशाप्रकारची यंत्रणाही बसवलेली असते, ज्यामुळे जर एखादा कर्मचारी उशिरा येत असेल, लवकर जात असेल तर त्याची नोंद घेतली जाते. काही कर्मचारी नियम पाळत असल्याने या शिस्तीसाठी कंपन्यांना पूर्णपणे दोषी ठरवता येणार नाही. पण काही कंपन्या हे नियम फार कठोरपणे पाळतात. नुकतंच एका कर्मचाऱ्याने रेडिटवर पोस्ट शेअर केली असून ती व्हायरल झाली आहे. फक्त एक मिनिट लवकर जात असल्याने कंपनीने त्याला नोटीस पाठवली असून त्यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
कंपनीने सलग तीन दिवस एक मिनिट लवकर ऑफिसमधून जात असल्याने कर्मचाऱ्याला नोटीस पाठवली आहे. कंपनीने नोटीसमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या निरीक्षणात आलं आहे की, तुम्ही तुमच्या कामाची वेळ संपण्याची (5 वाजेपर्यंत) वाट न पाहता लवकर निघून जात आहात. जसं की आपली आधी चर्चा झाली त्यानुसार फक्त तंत्रज्ञांना माझ्या किंवा [पर्यवेक्षकाचे नाव] पूर्व परवानगीने त्यांच्या नियोजित वेळेपूर्वी आऊट करण्याची परवानगी आहे. कृपया ही नियमित बाब करु नका. जेव्हा तुम्ही तुमच्या नियोजित वेळेपूर्वी मंजूरी न घेता गेलात त्याची काही महिन्यांतील उदाहरणे दिली आहेत".
या नोटीसवरुन सोशल मीडियावर अनेकांनी मत मांडलं आहे. कंपनीच्या अवास्तव अपेक्षा आणि समजूतदारपणाच्या अभावावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनेकांनी या नोटीशीवर संताप व्यक्त केला आहे. विशेषत: फक्त एक मिनिट लवकर निघून गेल्याबद्दल त्याला फटकारलं असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
यानंतर अनेकांनी कमेंट करत आपल्याला कामाच्या ठिकाणी आलेले असे अनुभव आणि अयोग्य वागणुकीची माहिती दिली आहे. काहींनी कंपनीच्या भूमिकेवर नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केलं असून काम आणि आयुष्याचा समतोल राखताना कर्मचाऱ्यांची होणारी कसरत याकडे दुर्लक्ष करु नये असं मत मांडलं आहे.