कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडलं, कार्यकर्त्याने थेट पोलीस ठाण्यात केली तक्रार, म्हणाला "आता तर कुत्रेही..."

Crime News: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांचं पोस्टर फाडल्याने चक्क कुत्र्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. विजयवाडा पोलीस ठाण्यात (Vijayawada Police Station) तेलगू देसमच्या समर्थकाने ही तक्रार दाखल केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 14, 2023, 07:41 AM IST
कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडलं, कार्यकर्त्याने थेट पोलीस ठाण्यात केली तक्रार, म्हणाला "आता तर कुत्रेही..." title=

Crime News: राज्याच्या प्रमुखांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने किंवा सोशल मीडियावर (Social Media) अपमानजनक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एखाद्याविरोधात पोलीस तक्रार झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. अनेकदा त्यांच्यावर पोलीस कारवाईही केली जाते. काही वेळा हा वाद पोस्टर फाडल्यावरुनही निर्माण झालेला असतो. एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचे पोस्टर फाडल्यावर अनेकदा ही प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात. पण आंध्र प्रदेशात पोस्टर फाडल्याप्रकरणी चक्क कुत्र्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांचं पोस्टर फाडल्याने पोलीस ठाण्यात चक्क कुत्र्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या लेखी तक्रारीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, एकच चर्चा रंगली आहे. विजयवाडा पोलीस ठाण्यात तेलगू देसम पक्षाच्या समर्थक दसरी उदयश्री यांनी ही तक्रार दाखल केली आहे. लेखी तक्रारीत लिहिलं आहे त्यानुसार, ही तक्रार उपहासात्मकपणे करण्यात आली आहे. 

व्हिडीओत कुत्रा भिंतीवर लावण्यात आलेलं मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडताना दिसत आहे. दसरी उदयश्री यांनी तक्रारीत लिहिलं आहे की, हा मुख्यमंत्र्यांचा अपमान असून कुत्र्याविरोधात कारवाई केली पाहिजे. तसंच कुत्र्याला हे कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात आणि नंतर हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

आपण जगन मोहन रेड्डी यांचा आदर करत असून, आंध्र प्रदेशात कुत्राही त्यांचा अपमान करत आहे असंही त्या म्हणाल्या आहेत. 

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यक्रमानिमित्त हे पोस्ट लावण्यात आले होते. वायएसआर काँग्रेस पक्षाकडून सध्या राज्यभरात सर्व्हे केला जात असून त्या पार्श्वभूमीवर Jagananna Maa Bhavishyathu या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. Jagananna Maa Bhavishyathu याचा अर्थ जगन अन्ना आपलं भविष्य आहे असा आहे.