अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आपल्या गावी पोहोचले, पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पीएम मोदी हे पहिल्यांदा गावी वडनगरला आले आहेत. या वेळी वडनगरमध्ये त्यांच्या संरक्षणासाठी विषेश व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी वडनगरच्या स्टेशनला नववधू सारखं सजवण्यात आलं आहे. पीएम मोदी याचं स्टेशनवर कधी वडिलांसोबत चहा विकत होते. पीएम मोदी जेव्हा वडनगर रेल्वे स्टेशनला पोहोचतील तेव्हा, रेल्वेच्या नव्या बिल्डिंगचं लोकार्पण करतील.
रेल्वे स्टेशनवर अनेक बदल झाले आहेत, मात्र पीएम मोदी यांच्या वडिलांचं चहाचं दुकान आजही तसेच ठेवण्यात आलं आहे, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वडनगर स्टेशनच्या बाहेर झाडाखाली एक चहाची किटली ठेवण्यात आली आहे. येथे चाय पर चर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
स्टेशनच्या दुसऱ्या कोपऱ्यात सजावट केलेल्या काही वस्तू लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असंही लिहिलंय, भारत-चीन युद्धादरम्यान पीएम मोदी स्टेशनवर येणाऱ्या भारतीय सैनिकांना चहा आणि जेवण देत असतं. एवढंच नाही नरेंद्र मोदी यांच्या लहानपणाच्या फोटोंचं एक प्रदर्शन देखील लावण्यात आलं आहे.